मुंबई: नवीन युगातील तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास क्षेत्रात जगात अग्रेसर असलेल्या दक्षिण कोरिया आणि महाराष्ट्र शासनामध्ये एक नवा मैलाचा दगड प्रस्थापित झाला आहे. महाराष्ट्रातील तरुणांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि दक्षिण कोरियाच्या अग्रगण्य संस्थांमध्ये ३ महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoUs) करण्यात आले आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हे करार संपन्न झाले.
या करारांमुळे दक्षिण कोरियाचे प्रगत तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट कौशल्य भारतात येईल, ज्याचा थेट फायदा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना होईल. या माध्यमातून मूलभूत कौशल्यांपासून ते उच्च-स्तरीय प्रगत कौशल्यांपर्यंतच्या सर्व स्तरांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
कौशल्याच्या जोरावर महाराष्ट्र बनणार १ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था
कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भारताची ६५% लोकसंख्या ही ३५ वर्षांखालील आहे. ही तरुण पिढी आपली खरी ताकद आहे. या तरुणांच्या कल्पकतेला आणि ऊर्जेला कुशल मानवी संसाधनात रूपांतरित करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असून सध्या राज्याची अर्थव्यवस्था ६६० अब्ज डॉलर्सची आहे. ही अर्थव्यवस्था लवकरच १ ट्रिलियन डॉलर्सवर नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, ज्यासाठी कुशल मनुष्यबळाची अत्यंत गरज आहे.”
राज्याला तांत्रिक आणि औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी सरकार सातत्याने पावले उचलत आहे. नुकतेच अणुऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र मोठी झेप घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी जागतिक गुंतवणुकीचे आवाहन केले होते. आता हा दक्षिण कोरियासोबतचा करार त्याच दिशेने टाकलेले आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
महाराष्ट्रातील कौशल्य विकासाचे नवे पर्व – मंत्री मंगल प्रभात लोढा
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले की, हा करार राज्यातील कौशल्य विकास व्यवस्थेला नवे बळ देईल. उद्योगांच्या गरजेनुसार आधुनिक तंत्रज्ञान-स्नेही मनुष्यबळ तयार करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. या ऐतिहासिक भागीदारीमुळे महाराष्ट्र देशात कौशल्य विकास क्षेत्रात अग्रस्थानी राहील.
यापूर्वी देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील तंत्रज्ञान आणि उद्योग विकासाला चालना देण्यासाठी CSR निधीतून महाराष्ट्रात विकासाचे नवे पर्व सुरू करण्याचा संकल्प जाहीर केला होता, ज्यामुळे उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळणे सोपे जाणार आहे.
करारानुसार राबवले जाणारे महत्त्वाचे प्रकल्प आणि उपक्रम:
१. महाराष्ट्रात उभारले जाणार ‘लर्निंग फॅक्टरी’ मॉडेल
राज्य शासनाचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET) आणि दक्षिण कोरियाच्या ‘कोरिया पॉलिटेक्निक्स’ यांच्यातील भागीदारी अंतर्गत महाराष्ट्रात प्रगत प्रशिक्षण केंद्रे उभारली जातील. ही केंद्रे दक्षिण कोरियातील प्रसिद्ध ‘Learning Factory’ मॉडेलवर आधारित असतील. यामध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणावर भर दिला जाईल. मार्च २०२७ ते जून २०२८ दरम्यान ही केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे.
२. ‘लाइफलाँग लर्निंग’ धोरणाद्वारे सतत कौशल्य वृद्धी
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था (MSSDS) आणि दक्षिण कोरियाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर लाइफलाँग एज्युकेशन’ (NILE) यांच्यात झालेल्या करारानुसार, राज्यातील युवक आणि कर्मचाऱ्यांसाठी सतत कौशल्य वाढवण्यासाठी डिजिटल शिक्षण आणि प्रमाणपत्र प्रणाली विकसित केली जाईल. यामुळे नोकरी करत असतानाही नवनवीन तंत्रज्ञान शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
३. उच्च शिक्षण आणि जागतिक संशोधनाची संधी
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (RT-MSSU) आणि दक्षिण कोरियातील नामांकित ‘कैस्टा’ (KAIST) संस्थेमध्ये झालेल्या करारामुळे विद्यापीठाचे निवडक प्राध्यापक व विद्यार्थ्यांना दक्षिण कोरियामध्ये मास्टर्स आणि पी.एचडी. करण्याची संधी मिळणार आहे. तसेच दोन्ही संस्था मिळून ‘जॉइंट रिसर्च सेंटर ऑन ग्लोबल सस्टेनेबिलिटी’ हे संयुक्त संशोधन केंद्र स्थापन करणार आहेत.
‘दक्ष’ प्रकल्पासाठी दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळा
कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी सांगितले की, ‘कोरिया-वर्ल्ड बँक पार्टनरशिप फॅसिलिटी’ (KWPF) अंतर्गत मिळालेल्या अनुदानामुळे आयटीआय (ITI) सुधारणेचे प्रकल्प राबवले जात आहेत. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या माध्यमातून भारत आणि दक्षिण कोरियाचे तंत्रज्ञान तज्ज्ञ एकत्र येऊन या संस्थात्मक क्षमता अधिक बळकट करणार आहेत.
या ऐतिहासिक कार्यक्रमाला दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, विद्यापीठाचे कुलगुरू आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.