भारतीय टपाल विभाग: केवळ सेवाच नाही, तर संस्कृतीचा अविभाज्य भाग
मुंबई: भारतीय टपाल विभाग हा देशातील गरीब-श्रीमंत, जात आणि धर्म या पलीकडे जाऊन प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला एक महत्त्वाचा दुवा आहे. कारगिल युद्धाच्या कठीण काळातही जवानांचे संदेश त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवणारा हा विभाग मानवी संवेदनांचा वाहक ठरला आहे. पोस्ट विभाग हा केवळ पत्र पोहोचवणारा विभाग नसून तो भारतीय सांस्कृतिक व्यवस्थेचा एक कणा आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातील नूतनीकरण करण्यात आलेल्या अत्याधुनिक पोस्ट ऑफिसचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते दिमाखात पार पडले. या सोहळ्याला आमदार अमित साटम, आमदार हारून खान आणि पोस्ट विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
‘वारसा आणि विकास’ यांचा संगम: पोस्टाचे आधुनिक रूप
मुख्यमंत्री म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘वारसा आणि विकास’ या संकल्पनेतून पोस्ट विभागाने कात टाकली आहे. आज इंटरनेट आणि ईमेलच्या युगात खाजगी कुरिअर सेवांचे मोठे आव्हान समोर असतानाही, पोस्ट विभागाने आधार सेवा, बँकिंग आणि ऑटोमॅटिक पार्सल सेवा यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. प्रशासनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी जशी प्रशासनाला नवी दिशा देणारी ‘टेक-वारी 2.0’ राबवली जात आहे, तसेच क्रांतिकारक बदल आता पोस्ट विभागातही पाहायला मिळत आहेत.
पोस्ट विभागाने आपल्या महसुलात मोठी वाढ केली असून तो अडीच टक्क्यांवरून थेट १६ टक्क्यांवर नेला आहे. ज्याप्रमाणे राज्य सरकार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी च्या माध्यमातून सामान्यांना आधार देत आहे, त्याचप्रमाणे पोस्ट विभाग आता बँकिंग आणि इतर सुविधांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा आधारस्तंभ बनत आहे.
‘जनसेवा कनेक्ट’ अंतर्गत २२०० नवीन पोस्ट ऑफिस
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी यावेळी पोस्ट विभागाच्या भविष्यातील वाटचालीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, ‘नेक्स्ट जनरेशन पोस्ट ऑफिस’ या संकल्पनेतून देशभरात १०० हून अधिक अत्याधुनिक पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये कॅफे, वाय-फाय, इंटरनेट आणि आधार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात ‘जनसेवा कनेक्ट’ उपक्रमांतर्गत २२०० नवीन पोस्ट ऑफिस सुरू करण्यात येणार असून, यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना अधिक सक्षम सेवा मिळणार आहेत.
अंधेरी पोस्ट ऑफिसची ठळक वैशिष्ट्ये:
- अत्याधुनिक पायाभूत सुविधा: १९३२-३३ मध्ये स्थापन झालेल्या या जुन्या कार्यालयाचे आता पूर्णपणे हायटेक डिजिटल सेवा केंद्रात रूपांतर झाले आहे.
- डिजिटल सेवा: येथे आधार नोंदणी, बँकिंग सेवा आणि २४ तास स्पीड पोस्ट डिलिव्हरी सुविधा उपलब्ध असेल.
- महसुली वाढ: २०२५-२६ आर्थिक वर्षात पोस्ट विभागाने २५०० कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी, ‘जन सेवा कनेक्ट’ उपक्रमावरील विशेष पोस्टल कव्हरचे प्रकाशन करण्यात आले. पोस्टमनबद्दलची आत्मीयता आजही समाजात कायम असून, पु. ल. देशपांडे आणि शरद जोशी यांच्या साहित्यातूनही याचे महत्त्व अधोरेखित झाले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.