पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून थकीत कर्जदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला जात आहे. मात्र, कर्जमाफीचा हा निधी खात्यात जमा होण्यासाठी आधार प्रमाणीकरण (e-KYC) पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यात सध्या हजारो शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया प्रलंबित असून, आधार प्रमाणीकरण केल्याशिवाय कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळणार नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य शासनाने अलीकडेच महाराष्ट्र मंत्रिमंडळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत शेतकरी हिताच्या योजनांना प्राधान्य दिले आहे. अशा परिस्थितीत कर्जमाफी योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक पात्र शेतकऱ्याने वेळेत ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे.
सोलापूर जिल्ह्यातील कर्जमाफीची सद्यस्थिती
सोलापूर जिल्ह्यात सुमारे अडीच लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरतील असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, सध्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील याद्या प्राप्त झाल्या आहेत. यातील आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
- कर्जदारांची अपलोड झालेली यादी: ५९,८५१
- एकूण पात्र शेतकरी: २६,२५३
- ई-केवायसी (e-KYC) पूर्ण केलेले शेतकरी: ३,२६२
- ई-केवायसी प्रलंबित असलेले शेतकरी: २२,९९१
आकडेवारीवरून स्पष्ट होते की, अजूनही २२ हजारांहून अधिक पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे. त्यामुळे ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
याद्यांमधील चुकांमुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ
प्रसिद्ध करण्यात आलेल्या गावनिहाय याद्यांमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी समोर आल्या आहेत. काही शेतकऱ्यांच्या नावात, आडनावात (उदा. ‘कादे’ ऐवजी ‘कडे’) चुका झाल्या आहेत. तसेच, एका गावातील शेतकऱ्याचे नाव दुसऱ्याच गावाच्या यादीत समाविष्ट झाल्याचे प्रकार घडले आहेत. सावळेश्वर (ता. मोहोळ) येथील नागनाथ रामचंद्र गावडे यांचे नाव लांबोटी गावाच्या यादीत आढळले आहे. अशा चुकांमुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे.
नुकत्याच झालेल्या विविध अस्मानी संकटांमुळे व मुसळधार पावसाच्या इशार्यामुळे आधीच शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तसेच शासनाने पूरग्रस्तांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर केले आहे. त्यामुळे कर्जमाफीची ही रक्कम वेळेत मिळणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे.
आधार प्रमाणीकरण (e-KYC) कसे करावे?
कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील पायऱ्यांचे पालन करावे:
- आपल्या गावातील ग्रामपंचायत, बँक शाखा किंवा तलाठी कार्यालयाबाहेर लावण्यात आलेली पात्र शेतकऱ्यांची यादी तपासावी.
- यादीत आपले नाव, बँक खाते क्रमांक आणि कर्जाची रक्कम अचूक असल्याची खात्री करावी.
- नाव असल्यास, आपले आधार कार्ड घेऊन गावातील ‘आपले सरकार सेवा केंद्रात’ (CSC Center) जावे.
- तिथे बायोमेट्रिक (अंगठ्याचा ठसा) देऊन आधार प्रमाणीकरण (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन
सोलापूरचे जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी सांगितले की, “जिल्ह्यातील सर्व थकीत कर्जदार शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी यादीतील आपली माहिती तपासून त्वरित आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. ई-केवायसी पूर्ण झाल्याशिवाय कर्जमुक्तीची रक्कम बँक खात्यावर वर्ग केली जाणार नाही.”