महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची रक्कम थेट वर्ग करण्यात आली आहे. या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील तब्बल ६ लाख ३६ हजार ३६ शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ५ हजार ८६ कोटी ३० लाख ६२ हजार ३०० रुपये जमा करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल प्रणालीद्वारे (डीबीटी) एका क्लिकवर हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग करण्यात आला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यापूर्वी शासनाने जाहीर केल्यानुसार शेतकऱ्यांना मोफत वीज आणि कर्जमाफीचा शब्द पूर्ण करण्याचा संकल्प महायुती सरकारने पूर्णत्वास नेला आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याची एकत्रित स्थिती
या कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील ६ लाख २२ हजार २०७ शेतकऱ्यांना ५ हजार २८ कोटी ७० लाख ३८ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले होते. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात ५ हजार कोटींहून अधिक रक्कम वितरित झाल्याने लाखो शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होण्यास मोठी मदत झाली आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या बोटांचे ठसे उमटत नसल्याने (Biometric authentication) तांत्रिक अडचणी येत होत्या, त्यांच्यासाठीही शासनाने विशेष पडताळणी पद्धत लागू करून त्यांना कर्जमाफीच्या लाभापासून वंचित न ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
विभागवार कर्जमाफी निधी वाटपाचा सविस्तर तपशील:
१. छत्रपती संभाजीनगर विभाग (मराठवाडा)
दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्याला सर्वाधिक लाभ मिळाला आहे. या विभागातील ३ लाख २ हजार २७३ शेतकऱ्यांना तब्बल २,२८४ कोटी ४४ लाख रुपये मिळाले आहेत.
- बीड: ४०० कोटी ३२ लाख रुपये
- नांदेड: ३८१ कोटी ९४ लाख रुपये
- जालना: ३६६ कोटी २७ लाख रुपये
- परभणी: ३४८ कोटी २ लाख रुपये
- छत्रपती संभाजीनगर: २८७ कोटी ३२ लाख रुपये
- हिंगोली: १९५ कोटी ६१ लाख रुपये
- धाराशिव: १८३ कोटी ८५ लाख रुपये
- लातूर: १२१ कोटी ७ लाख रुपये
२. अमरावती विभाग (विदर्भ)
अमरावती विभागातील १ लाख ४५ हजार ८०८ शेतकऱ्यांच्या खात्यात १ हजार २०८ कोटी ३४ लाख ३० हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. यात बुलढाणा जिल्ह्यातील सर्वाधिक ५२,५२९ शेतकऱ्यांना ४०६ कोटी ११ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. याशिवाय यवतमाळला २९५ कोटी ५८ लाख, अमरावतीला २१५ कोटी ७५ लाख, वाशिमला १५० कोटी ५ लाख आणि अकोल्याला १४० कोटी ८२ लाख रुपये मिळाले आहेत.
३. नाशिक विभाग (उत्तर महाराष्ट्र)
नाशिक विभागातील ८४ हजार ८१३ शेतकऱ्यांना एकूण ७५६ कोटी ४ लाख १८ हजार रुपये वितरित करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच शासनाने नाशिक, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर केली होती, त्यानंतर आता हा कर्जमुक्तीचा निधी जमा झाला आहे.
- अहिल्यानगर: ४११ कोटी ४८ लाख रुपये
- धुळे: १०३ कोटी ६४ लाख रुपये
- जळगाव: १०० कोटी ५६ लाख रुपये
- नाशिक: ८६ कोटी ५१ लाख रुपये
- नंदुरबार: ५३ कोटी ८३ लाख रुपये
४. पुणे विभाग (पश्चिम महाराष्ट्र)
पुणे विभागातील ४९ हजार २२४ शेतकऱ्यांच्या खात्यात ४१७ कोटी ३७ लाख रुपये वर्ग करण्यात आले. यामध्ये पुण्याला सर्वाधिक १३८ कोटी ७१ लाख, सोलापूरला १०९ कोटी १० लाख, सांगलीला ६७ कोटी २५ लाख, साताऱ्याला ५४ कोटी ५८ लाख आणि कोल्हापूर जिल्ह्याला ४७ कोटी ७१ लाख रुपयांची मदत मिळाली आहे.
५. नागपूर विभाग
नागपूर विभागातील ४४ हजार ८६४ लाभार्थ्यांच्या खात्यात ३६५ कोटी ९५ लाख रुपये वितरित झाले. यामध्ये वर्धा जिल्ह्याला सर्वाधिक १२० कोटी ९० लाख, नागपूर जिल्ह्याला ९४ कोटी ६१ लाख, चंद्रपूरला ६४ कोटी ३२ लाख, भंडारा ५४ कोटी ९६ लाख, गोंदिया ३० कोटी ३० लाख आणि गडचिरोली जिल्ह्याला ९ कोटी ८३ लाख रुपये मिळाले आहेत.
६. कोकण विभाग
कोकणातील ९ हजार ५४ शेतकऱ्यांच्या खात्यावर ५४ कोटी १५ लाख २७ हजार रुपये जमा झाले आहेत. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९२९ शेतकऱ्यांसाठी ५ कोटी ५० लाख रुपयांची कर्जमाफी रक्कम जमा झाली आहे.
शेतकऱ्यांनी आपले बँक खाते तपासावे
पात्र शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांवर ही रक्कम डीबीटीद्वारे जमा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याचा एसएमएस तपासावा किंवा जवळच्या बँक शाखेत जाऊन खात्यावरील शिल्लक तपासावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.