नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय सोहळ्यात महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपल्या विकासाची आणि शेतकरी सक्षमीकरणाची नवी ओळख निर्माण केली आहे. केंद्र शासनाच्या पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (PMFME) उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्राला राष्ट्रीय पातळीवरील प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार म्हणजे राज्यातील कष्टकरी शेतकरी, महिला बचत गट, युवक आणि कृषी विभागाच्या अहोरात्र मेहनतीचे फलित असल्याचे प्रतिपादन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे पार पडलेल्या या शानदार कार्यक्रमात केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महाराष्ट्राच्या वतीने हा बहुमान स्वीकारला. याप्रसंगी कृषी संचालक विनयकुमार आवटे आणि PMFME चे राज्य व्यवस्थापक अमोल चिद्रावर उपस्थित होते. नुकतीच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान पटकावल्याची घोषणा झाली होती, त्यावर या पुरस्काराने अधिकृत मोहर उमटवली आहे.
महिला सक्षमीकरणात महाराष्ट्र अग्रेसर: ५६% प्रकल्प महिलांच्या नावे
या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा सहभाग. कृषीमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात एकूण ३१,९५६ प्रक्रिया प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून, त्यामध्ये १७,९४१ प्रकल्प हे थेट महिला लाभार्थ्यांचे आहेत. म्हणजेच एकूण प्रकल्पांपैकी तब्बल ५६ टक्के प्रकल्प महिलांच्या मालकीचे आहेत. याव्यतिरिक्त ५२२ समूह प्रकल्प आणि ७५ सामायिक पायाभूत सुविधा प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शासनाने विविध पातळ्यांवर काम हाती घेतले असून, एका बाजूला शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली जात असताना दुसऱ्या बाजूला शेतमालाचे मूल्यवर्धन करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम PMFME योजनेतून साध्य होत आहे.
महाराष्ट्राची ठळक आकडेवारी आणि कामगिरी:
- अनुदान वाटप: २५ हजारहून अधिक वैयक्तिक प्रकल्प, ३८८ समूह प्रकल्प आणि २५ सामायिक पायाभूत सुविधा प्रकल्पांना थेट अनुदानाचे वाटप.
- बीज भांडवल (Seed Capital): स्वयं सहाय्यता समूहांच्या ६१,३२३ सदस्यांना २२१.७७ कोटी रुपयांचे बीज भांडवल वितरित.
- रोजगार निर्मिती: या प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून सुमारे २.६४ लाख थेट रोजगार आणि ७.९२ लाख मनुष्य दिवस अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट.
- प्रक्रिया क्षमता: राज्यात १७.७९ लाख मेट्रिक टन अन्न प्रक्रिया क्षमता विकसित केली जात आहे.
- प्रशिक्षण: देशात सर्वाधिक म्हणजेच ४७,५४४ पेक्षा जास्त लाभार्थ्यांना यशस्वी प्रशिक्षण देण्यात आले.
देशातील टॉप १० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ७ जिल्हे
देशभरात सूक्ष्म अन्न प्रक्रिया क्षेत्रात सर्वोत्तम काम करणाऱ्या अव्वल १० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल ७ जिल्ह्यांचा समावेश आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांनी केलेल्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल त्यांनाही राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी आणि अहिल्यानगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी हा सन्मान स्वीकारला.
ग्रामीण भागातील शेतीमालाला स्थानिक बाजारासोबतच मोठ्या बाजारपेठांशी जोडण्यासाठी APMC बाजार समित्या आणि प्रक्रिया उद्योगांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) आणि नागरी उपजीविका अभियानाच्या (SULM) अधिकाऱ्यांनाही या वेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
“या राष्ट्रीय पुरस्कारामुळे शेतमालाचे मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची आणि ग्रामीण भागात उद्योग संस्कृती रुजवण्याची आमची जबाबदारी अधिक वाढली आहे,” असा विश्वास कृषीमंत्र्यांनी व्यक्त केला.