ठाणे: आदिवासी विकास विभाग हा केवळ सरकारी नियम आणि फाईल्सपुरता मर्यादित नसून, तो एक विशाल ‘परिवार’ आहे. १९८३ मध्ये या विभागाची स्वतंत्र स्थापना झाल्यापासून शिक्षक, गृहपाल, विद्यार्थी, सचिव आणि मंत्र्यांपर्यंत आपण सर्वजण या कुटुंबाचे सदस्य आहोत. जोपर्यंत आपल्यामध्ये कौटुंबिक संवाद, विश्वास आणि स्नेह निर्माण होत नाही, तोपर्यंत या विभागाचे कार्य खऱ्या अर्थाने यशस्वी होणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. प्रा. अशोक वुईके यांनी केले.
शहापूर येथे आदिवासी आश्रमशाळांची गुणवत्ता आणि पटसंख्या वाढवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोडे, अपर आयुक्त गोपिचंद कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रशासकीय त्रुटी संवादातून दूर करा
मंत्री महोदयांनी यावेळी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना आत्मचिंतन करण्याचे आवाहन केले. इंजिनिअरला प्रकल्प अधिकारी माहीत नसणे किंवा इमारती तयार असूनही केवळ समन्वयाअभावी त्या हस्तांतरित न होणे, यांसारख्या त्रुटी प्रशासकीय कामात अडथळे निर्माण करतात. हे टाळण्यासाठी ‘इगो’ बाजूला ठेवून सर्वांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी एकत्र येणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ज्याप्रमाणे सध्या प्रशासकीय कामात एआयची क्रांती होत आहे, त्याच धर्तीवर आपल्या विभागातही आधुनिकता आणि पारदर्शकता आणणे गरजेचे आहे.
महिला अधिकाऱ्यांच्या नियोजनाचे कौतुक
विभागाच्या आर्थिक शिस्त आणि सूक्ष्म नियोजनात महिला अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या कौशल्याचे डॉ. उईके यांनी विशेष कौतुक केले. कुटुंबाची तिजोरी ज्याप्रमाणे महिलांकडे सुरक्षित असते, तसेच विभागाचे नियोजन महिला अधिकारी उत्तम रितीने करत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास आणि त्यांना मिळणारे दर्जेदार शिक्षण ही आपली नैतिक जबाबदारी असून १५ जून रोजी शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व सोयी-सुविधांचे नियोजन पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास करताना ज्याप्रमाणे शेत आणि पाणंद रस्त्यांना गती दिली जात आहे, त्याच वेगाने आश्रमशाळांचाही कायापालट व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विद्यार्थी हाच केंद्रबिंदू: आयुक्त लीना बनसोडे
कार्यशाळेला संबोधित करताना आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोडे यांनी स्पष्ट केले की, शासन, प्रशासन आणि प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे ‘फुट सोल्जर’ म्हणजेच शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यात एकवाक्यता निर्माण करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थी हाच या संपूर्ण प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहे. १५ जूनला शाळा सुरू होताच सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांचे साहित्य आणि सोयी-सुविधांसह स्वागत करण्यासाठी विभाग पूर्णतः सज्ज आहे.
शिक्षकांच्या मुख्यालयी राहण्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी नमूद केले की, केवळ सक्ती करण्याऐवजी शिक्षकांना स्वतःला तिथे राहून काम करण्याची प्रेरणा मिळेल अशी व्यवस्था निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. या कार्यशाळेतून मिळालेली ऊर्जा आगामी काळात आश्रमशाळांच्या परिवर्तनासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास सर्वच मान्यवरांनी व्यक्त केला.