मुंबई: महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची ओळख केवळ राज्य अथवा देशापुरती मर्यादित न राहता ती आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावीपणे पोहोचली पाहिजे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल ब्रँडिंग आणि नाविन्यपूर्ण मार्केटिंग धोरणावर भर देण्याचे स्पष्ट निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठकीत पर्यटन मंत्री बोलत होते. या बैठकीत महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षातील विपणन (मार्केटिंग) आणि ब्रँडिंग कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला, तसेच आगामी २०२६-२७ या वर्षासाठीच्या कृती आराखड्यावर (Action Plan) सविस्तर चर्चा करण्यात आली.
पर्यटन क्षेत्रासाठी विशेष कृती आराखडा आणि डिजिटल ब्रँडिंग
पर्यटन मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर उच्च स्थानावर नेण्यासाठी आधुनिक माध्यमांचा वापर अत्यंत आवश्यक आहे. सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग campaigns आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या आधारे जगभरातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित केले पाहिजे.
या बैठकीला पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (MTDC) व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे, पर्यटन संचालनालयाचे संचालक मंगेश जोशी, उपसचिव संतोष रोकडे, उपसचिव विजय पोवार, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, सहसंचालक संतोष जाधव यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
संस्कृती, परंपरा आणि खाद्यसंस्कृतीचा जागतिक प्रचार
महाराष्ट्राला समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. राज्यातील गड-किल्ले, ऐतिहासिक वास्तू, लोकपरंपरा, पारंपरिक कला आणि वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती ही आपल्या राज्याची खरी ताकद आहे. या सर्व बाबींचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावीपणे प्रचार करून राज्याची स्वतंत्र पर्यटन ओळख निर्माण करण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
राज्यात धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला मोठा वाव असून, अलीकडेच श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थक्षेत्राच्या कायापालटासारख्या विविध प्रकल्पांतून पर्यटना पायाभूत सुविधा मजबूत केल्या जात आहेत. याच धर्तीवर पर्यटन विभाग, MTDC आणि इतर संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करून पर्यटन मोहिमांची अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी नमूद केले.
पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना
महाराष्ट्रातील नैसर्गिक सौंदर्य, समुद्रकिनारे आणि पश्चिम घाटातील समृद्ध जैवविविधता पर्यटकांना भुरळ घालते. निसर्ग पर्यटनासोबतच कांदळवन संवर्धन व पर्यावरणपूरक उपक्रमांची जोड देऊन शाश्वत पर्यटनाचा प्रचार करण्याचे नियोजनही या आराखड्यात अंतर्भूत केले जाणार आहे.
पर्यटन विभागाच्या या नव्या नियोजनबद्ध धोरणामुळे आगामी काळात महाराष्ट्राचा पर्यटन ब्रँड जागतिक स्तरावर अधिक बळकट होईल आणि मोठ्या प्रमाणावर परदेशी पर्यटक महाराष्ट्राला भेट देतील, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.