National Panchayat Awards 2025: शाश्वत विकास उद्दिष्टांच्या (SDGs) प्रभावी पूर्ततेमध्ये महाराष्ट्राने राष्ट्रीय पातळीवर ऐतिहासिक कामगिरी करत आपली ठळक छाप उमटवली आहे. नवी दिल्लीत आयोजित दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध ग्रामपंचायतींना राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यामध्ये भंडारा आणि रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी देशात अव्वल स्थान पटकावून प्रत्येकी १ कोटी रुपयांचे रोख पारितोषिक जिंकले आहे.
महाराष्ट्राची राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी
केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्ली येथे ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५’ वितरण सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय पंचायती राज मंत्री श्री. राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह, केंद्रीय राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल आणि आसामचे मंत्री श्री. रामेश्वर तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
दारिद्र्य निर्मूलन, जलसंधारण, स्वच्छता, आरोग्य, बालकल्याण, पारदर्शक सुशासन आणि महिला सक्षमीकरण या ९ मुख्य संकल्पनांवर आधारित कामगिरीचे मूल्यमापन करून देशातील उत्कृष्ट ४२ पंचायतींची निवड करण्यात आली होती.
‘या’ ग्रामपंचायतींनी मिळवला सर्वोच्च बहुमान
- इटगाव (पु.), जि. भंडारा (बालस्नेही पंचायत – देशात प्रथम): भंडारा जिल्ह्यातील इटगाव (पु.) ग्रामपंचायतीने ‘बालस्नेही पंचायत’ श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवत तब्बल १ कोटी रुपयांचे पारितोषिक पटकावले. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी केलेल्या अभूतपूर्व कार्यासाठी हा गौरव करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या पातळीवर शाळांच्या शैक्षणिक दर्जासाठी विशेष प्रयत्न सुरू असतानाच, दुसरीकडे राज्य पातळीवरही शासकीय शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी विशेष पावले उचलली जात आहेत.
- खारीवली (खालापूर), जि. रायगड (जलसमृद्ध पंचायत – देशात प्रथम): जलसंधारण आणि जलव्यवस्थापन क्षेत्रात क्रांती घडवत रायगडच्या खारीवली ग्रामपंचायतीने देशात प्रथम क्रमांक मिळवला आणि १ कोटी रुपयांचा निधी प्राप्त केला. रायगड जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब ठरली आहे. एकीकडे ग्रामविकासाचे हे उत्कृष्ट चित्र समोर येत असताना, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी देखील कोकण विभागात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठा धडाका लावत धडक कारवाया सुरू ठेवल्या आहेत.
- निंबळे (चांदवड), जि. नाशिक (सुशासन पंचायत – देशात द्वितीय): पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी नाशिकच्या निंबळे ग्रामपंचायतीने ‘सुशासन पंचायत’ श्रेणीत देशात दुसरा क्रमांक मिळवत ७५ लाख रुपयांचे बक्षीस मिळवले.
- चांभारली (खालापूर), जि. रायगड (सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षा – देशात द्वितीय): रायगडच्या चांभारली ग्रामपंचायतीने सामाजिक सुरक्षा श्रेणीत उत्कृष्ट कार्य करत देशात द्वितीय क्रमांक पटकावला आणि ३७.५ लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले.
यशोगाथांचे ई-पुस्तक आणि माहितीपटाचे अनावरण
या विशेष सोहळ्यात देशभरातील पंचायतींच्या उत्कृष्ट यशोगाथांचे दस्तऐवजीकरण करणाऱ्या एका विशेष ई-पुस्तकाचे आणि मार्गदर्शक ठरणारे ‘बेस्ट प्रॅक्टिसेस कॉम्पेंडियम’चे अनावरण करण्यात आले. यावेळी निवडक ग्रामपंचायतींच्या कारभारावर आधारित माहितीपटही दाखवण्यात आला.
या कार्यक्रमाला पंचायती राज मंत्रालयाचे सचिव श्री. विवेक भारद्वाज, अवर सचिव श्री. सुशील कुमार लोहानी यांच्यासह देशातील वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि पंचायत प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्राच्या या यशाने ग्रामीण विकासाच्या मॉडेलला राष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळवून दिली आहे.