धुळे : शिंदखेडा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही. उपलब्ध निधीतून रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, भुयारी गटार आणि विविध नागरी सुविधांची कामे अत्यंत दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. गावात बालाजीचा रथ ओढताना जसे सर्व गावकरी एकत्र येतात, अगदी त्याचप्रमाणे शहराच्या विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
शिंदखेडा नगरपंचायतीला ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत प्राप्त झालेल्या अत्याधुनिक मैला उपसा वाहनाचे लोकार्पण पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला नगरपंचायतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावती माळी, उपनगराध्यक्ष उदय देसले, तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्यासह विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाणीपुरवठा योजना आणि सिंचनाचे नियोजन
शिंदखेडा शहराच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्याचे सांगताना पालकमंत्री म्हणाले की, शिंदखेडा हा दीर्घकाळापासून दुष्काळाचा सामना करणारा परिसर आहे. त्यामुळे नागरिकांना नियमित व पुरेसे पाणी पुरवणे ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. शहरासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे २१ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली असून, आता २३ कोटी रुपयांची दुसरी योजनाही मंजूर झाली आहे.
सुलवाडे-जामफळ योजनेचे पाणी केवळ घरांपर्यंतच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या शेतांपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन सुरू आहे. राज्य शासन दुष्काळी भागातील जनतेसाठी कटिबद्ध असून, नुकतेच दुष्काळ निवारण आणि जलव्यवस्थापनावर सरकारचा भर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच शेती क्षेत्रात शाश्वत पाण्यासाठी सूक्ष्म सिंचन आणि यांत्रिकीकरणासाठी भरीव निधी देण्यावरही भर दिला जात आहे.
९६ कोटींची भुयारी गटार योजना आणि स्वच्छता उपक्रम
शिंदखेडा शहरासाठी सुमारे ९६ कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठपुरावा स्तरावर आहे. ही योजना मार्गी लागल्यानंतर शहरातील सांडपाणी, दुर्गंधी आणि आरोग्याशी संबंधित समस्या कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल. तसेच घनकचरा आणि मैला व्यवस्थापनासाठी नगरपंचायतीला स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आज लोकार्पण करण्यात आलेले आधुनिक मैला उपसा वाहन ३,००० लिटर क्षमतेचे असून, त्यामध्ये २,५०० लिटर मैला साठवण क्षमता आणि ५०० लिटर स्वच्छ पाण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. या यांत्रिक पद्धतीमुळे सफाई कामगारांना थेट मैल्याशी संपर्क करावा लागणार नाही, ज्यामुळे त्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता जपली जाईल. वाहनाची नियमित देखभाल आणि योग्य वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी नगरपंचायत प्रशासनाला दिल्या.
रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि शहराचे सुशोभीकरण
शहरातील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाविषयी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, यासाठी निधी उपलब्ध आहे. स्थानिक व्यापारी, नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन रस्त्याच्या रुंदीकरणाचा निर्णय घ्यावा. याशिवाय बुराई नदीकाठ परिसराचे सुशोभीकरण, पथदिवे, महापुरुषांची स्मारके आणि नगरपंचायतीची स्वतंत्र भव्य प्रशासकीय इमारत उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
“राजकीय मतभेद असू शकतात, पण शहराच्या प्रगतीत अडथळा निर्माण होता कामा नये. विकासाच्या मुद्द्यावर सर्वांनी समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे,” असे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी शेवटी केले.