Maha Walkathon 2026 – Walk for Water: राज्यातील शाश्वत विकासासाठी माती आणि पाणी संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ (Maha Walkathon-Walk for Water) या राज्यव्यापी उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची मुख्य थीम ‘सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सेक्युअर टुमारो’ (Save Soil, Save Water, Secure Tomorrow) अशी असून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हे मुख्य घोषवाक्य आहे.
जलसंवर्धनाला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी राज्य शासनाने हा पुढाकार घेतला असून, नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे. दरम्यान, यापूर्वीही महा वॉकेथॉन ‘वॉक फॉर वॉटर’: जलसंधारण दिनानिमित्त राज्यव्यापी मोहीम राबवण्याबाबत प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी सुरू करण्यात आली होती.
महा वॉकेथॉनचे स्वरूप आणि सहभाग कसा नोंदवाल?
२१ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये कमाल ३ किलोमीटर अंतराची ‘महा वॉकेथॉन’ आयोजित केली जाईल. चालणे पूर्ण झाल्यानंतर सर्व सहभागी नागरिक मृद व जलसंधारणाची सामूहिक शपथ घेतील.
- ऑनलाईन नोंदणी: महा वॉकेथॉनमध्ये सहभागासाठी विशेष QR कोड आधारित नोंदणी प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- ई-प्रमाणपत्र आणि सन्मान: सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकाला डिजिटल ई-प्रमाणपत्र (E-Certificate) मिळेल. तसेच जिल्हास्तरावर पहिल्या १० विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविले जाईल.
- सोशल मीडिया हॅशटॅग: मोहिमेच्या जनजागृतीसाठी नागरिकांनी सोशल मीडियावर
#MahaWalkathon,#WalkForWater, आणि#SaveSoilSaveWaterया हॅशटॅगचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य पातळीवर पाणी साठवणूक आणि जलव्यवस्थापनाला बळकट करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, नदीजोड प्रकल्पांद्वारे महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार असल्याचा निर्धारही शासनाने यापूर्वी व्यक्त केला आहे.
‘रील फॉर सॉईल अँड वॉटर’: तरुणांसाठी राज्यव्यापी Instagram रील स्पर्धा
१५ ते २१ ऑगस्ट २०२६ या ‘जलसंधारण सप्ताह’ दरम्यान राज्यातील १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींसाठी राज्यस्तरीय Reel for Soil and Water Conservation स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
रील स्पर्धेचे नियम आणि अटी:
- पात्र वयोगट: १५ ते ३० वर्षे.
- कालावधी: ३० ते ६० सेकंदांची Instagram Reel बनवणे आवश्यक आहे.
- सुरुवातीची माहिती: रीलच्या सुरुवातीला रीलचा मुख्य उद्देश, स्पर्धकाचे नाव व जिल्ह्याचे नाव असणे बंधनकारक आहे.
- अपलोड प्रक्रिया: रील स्वतःच्या पब्लिक इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत अकाउंटला टॅग करावे आणि
#SaveSoilSaveWaterहा हॅशटॅग वापरावा. - नोंदणी: अधिकृत QR कोड स्कॅन करून रीलची लिंक, जिल्हा व माहिती सबमिट करावी लागेल.
आकर्षक रोख पारितोषिके:
प्रत्येक जिल्ह्यातून विजेत्यांना खालीलप्रमाणे रोख बक्षिसे व गौरवचिन्ह देण्यात येणार आहेत:
- प्रथम क्रमांक: ₹२५,००० रोख व गौरवचिन्ह
- द्वितीय क्रमांक: ₹१५,००० रोख व गौरवचिन्ह
- तृतीय क्रमांक: ₹१०,००० रोख व गौरवचिन्ह
- सर्व पात्र स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र आणि विजेत्यांना ‘युवा मृद-जलदूत’ ही विशेष पदवी बहाल केली जाईल.
जलसंपदेचे सुयोग्य नियोजन करून शेतकऱ्यांपर्यंत पाण्याचा प्रत्येक थेंब पोहोचवण्यासाठी शेतकरीहिताला सर्वोच्च प्राधान्य देत जलसंपदा विभाग स्वयंपूर्ण करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत.
शाळा-महाविद्यालयांमध्ये जलसंधारण अभियान
१५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या प्रदीर्घ कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘जलसंधारण अभियान’ राबवले जाईल. यामध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला/पोस्टर स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, ‘एक शाळा – एक शोषखड्डा’ उपक्रम आणि ‘जलदूत’ घोषणा यांसारखे नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये जलसाक्षरता वाढवली जाणार आहे.
२६ जानेवारी २०२७ रोजी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळा, महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केले जाईल.