महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि आशियाई विकास बँक (ADB) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाचा दुसरा टप्पा म्हणजेच ‘मॅग्नेट २.०’ लवकरच अधिक वेगाने सुरू होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील बळीराजाला आधुनिक बाजारपेठ, उच्च क्षमतेची प्रक्रिया सुविधा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शेतीमालाच्या निर्यातीच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी घोषणा राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केली.
नुकतीच या प्रकल्पाच्या कामकाजाचा आणि प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत प्रकल्पाच्या पुढील टप्प्यासाठी प्रशासकीय आणि आर्थिक मंजुरीची प्रक्रिया गतिमान करण्याचे आदेश देण्यात आले. यापूर्वी पणन व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी हमीभाव खरेदी केंद्र आणि धान्य साठवणुकीचे काटेकोर नियोजन करा असे निर्देश पणन मंत्र्यांनी दिले होते, त्याच धर्तीवर आता फलोत्पादन व प्रक्रिया साखळीवर विशेष भर दिला जात आहे.
मॅग्नेट प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील यश (MAGNET Phase 1 Highlights)
बैठकीत दिलेल्या माहितीनुसार, मॅग्नेट प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी अनेक ठोस पावले उचलली गेली आहेत:
- प्रशिक्षण: ३३ हजारांपेक्षा अधिक फलोत्पादक शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती व काढणीपश्चात तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात आले.
- पायाभूत सुविधा: काढणीपश्चात हाताळणी आणि साठवणुकीशी संबंधित ६२ उपप्रकल्पांना आर्थिक पाठबळ देण्यात आले.
- शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPO) सहाय्य: १५३ शेतकरी उत्पादक कंपन्यांना सवलतीच्या दरात वित्तसाहाय्य तर ६७ कंपन्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आले.
- महिलांचा सहभाग: या प्रकल्पामुळे २ लाख ३२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना थेट फायदा झाला असून यामध्ये तब्बल ४८ टक्के महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे.
- खाजगी गुंतवणूक: या योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात २७१ कोटी रुपयांची खाजगी गुंतवणूक आकर्षित करण्यात यश आले असून ४,३०० हून अधिक रोजगारांची निर्मिती झाली आहे.
फलोत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षा मिळवून देण्यासाठी राज्य शासन जसे फळपीक विमा योजना: नारळ आणि सुपारी बागायतदारांसाठी मोठी संधी यांसारख्या योजना राबवत आहे, तसेच मॅग्नेट प्रकल्पाच्या माध्यमातून काढणीनंतर पिकांचे होणारे नुकसान टाळण्यावर भर दिला जात आहे.
‘मॅग्नेट २.०’ मध्ये काय असणार खास?
आगामी मॅग्नेट २.० प्रकल्प अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश असेल:
- २३ कृषी मूल्यसाखळ्यांचा विकास: राज्यातील विविध पिकांसाठी २३ विशेष व्हॅल्यू चेन्स तयार केल्या जातील.
- १ लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण: मोठ्या प्रमाणावर क्षमता विकास कार्यक्रम राबवून १ लाख शेतकऱ्यांना बाजारपेठेच्या मागणीनुसार उत्पादनाचे प्रशिक्षण दिले जाईल.
- ग्रीनफिल्ड इन्फ्रास्ट्रक्चर: नवीन प्रक्रिया केंद्रे, शीतगृहे (Cold Storage), आणि पॅक हाऊसेस उभारण्यात येतील.
- हब-अँड-स्पोक लॉजिस्टिक मॉडेल: ग्रामीण भागातील शेतीमाल जलद गतीने मुख्य बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी सुसज्ज वाहतूक व लॉजिस्टिक व्यवस्था उभारली जाईल.
समृद्धी महामार्ग आणि बंदरांशी जोडली जाणार कृषी मूल्यसाखळी
राज्यातील शेतीमालाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT), प्रस्तावित वाढवण बंदर आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग यांसारख्या प्रमुख वाहतूक मार्गांशी कृषी मूल्यसाखळी जोडण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल अत्यंत कमी वेळेत बंदरांपर्यंत पोहोचू शकेल आणि निर्यात वाढीला मोठा वेग मिळेल.
याशिवाय, रासायनिक अवशेष तपासणीसाठी अत्याधुनिक प्रयोगशाळांची निर्मिती आणि बाजार समित्यांचे आधुनिकीकरण करून राज्यातील शेतकऱ्यांच्या मालाला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम दर मिळवून देण्याचा शासनाचा मानस आहे.