धुळे: पावसाने दिलेल्या मोठ्या ओढीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी गंभीर संकटाचा सामना करत आहेत. कुठे वाढ खुंटलेला कापूस, तर कुठे पाऊस नसल्यामुळे अर्धवट सुकलेली मक्याची कणसे अशी विदारक स्थिती शेतात पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा धीर दिला.
बांधावर जाऊन शेतकऱ्यांची जाणून घेतली व्यथा
पालकमंत्री जयकुमार रावल यांनी शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे-शेवाडे परिसरातील अमराळे, अरावे तसेच साक्री तालुक्यातील छावडी भागातील शेतशिवारांना भेट दिली. यावेळी त्यांनी कापूस, मका आणि बाजरी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. पावसाअभावी कापसाची बोंडे न फुटणे, मक्याची वाढ थांबणे यांसारख्या समस्या शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर मांडल्या. याशिवाय येत्या काळात पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि कुटुंबाचा दैनंदिन उदरनिर्वाह कसा चालवायचा, या चिंतेने शेतकरी ग्रासले आहेत.
तसेच या भागातील पायाभूत सुविधा आणि दुष्काळी उपाययोजनांसंदर्भात शासन कटिबद्ध असून, यापूर्वीही शिंदखेड्याच्या विकासाचा रथ अविरत धावणार; पाणी, स्वच्छता आणि रस्त्यांच्या कामांना गती – पालकमंत्री जयकुमार रावल यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला होता.
धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यांना दुष्काळी मदतीचे कवच
शेतकऱ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री म्हणाले, “आज शेतात प्रत्यक्ष उभे राहिल्यावर नुकसानीचे वास्तव आणि तीव्रता स्पष्टपणे जाणवत आहे. धुळे, साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर या चारही तालुक्यांमधील बाधित शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीच्या कक्षेत आणण्यात आले आहे. राज्य शासन पूर्ण ताकदीने बळीराजाच्या पाठीशी उभे असून कोणताही पात्र शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही.”
राज्य पातळीवरही दुष्काळ निवारणासाठी व्यापक पावले उचलली जात असून दुष्काळ निवारण आणि जलव्यवस्थापनावर सरकारचा भर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पुढील १०-१२ महिन्यांचे सूक्ष्म नियोजन गरजेचे
सप्टेंबर महिना संपत आला असून पुढील पावसाळ्यापर्यंत सुमारे १० ते १२ महिने दुष्काळी स्थितीशी मुकाबला करावा लागणार आहे. त्यामुळे केवळ सध्याचे नुकसान नव्हे, तर आगामी उन्हाळा लक्षात घेऊन प्रशासनाने पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि उपलब्ध जलस्रोतांचे नियोजन प्राधान्याने करावे, अशा सक्त सूचना ना. रावल यांनी दिल्या. चारा टंचाई भासू नये यासाठी शासनाचे महाराष्ट्र वैरण विकास धोरण पशुपालकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
पंचनामे गतीने करण्याचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश
शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक दिलासा मिळण्यासाठी कागदपत्रांची औपचारिकता अडथळा ठरू नये, असे स्पष्ट करत पालकमंत्री रावल यांनी पंचनाम्यांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश महसूल व कृषी यंत्रणेला दिले. विशेषतः अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या अडचणी अधिक गंभीर असल्याने त्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहून प्रशासनाने मिशन मोडवर काम करावे, असे त्यांनी निर्देशित केले.
या पाहणी दौऱ्यावेळी दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप, शिंदखेड्याचे तहसीलदार नितीनकुमार देवरे, साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे, तालुका कृषी अधिकारी सुधीर ईशी, वाय. डी. सोनवणे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.