पुणे शहराच्या सर्वांगीण विकासाला आणि फिनटेक क्षेत्राला नवा आयाम देणारे पाऊल पडले आहे. बजाज फिनसर्व्हच्या माध्यमातून उभारण्यात येणारे अत्याधुनिक, पर्यावरणपूरक आणि शाश्वत मुख्यालय पुण्याच्या प्रगतीला नवी दिशा देईल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या नव्या संकुलामुळे सुमारे ४० हजार रोजगार निर्माण होणार असून पुणे देशातील आघाडीचे वेगवान मोबिलिटी शहर म्हणून नावारूपाला येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बजाज फिनसर्व्हच्या प्रस्तावित भव्य मुख्यालयाच्या भूमिपूजन समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज, सीएसआर अध्यक्षा शेफाली बजाज, बजाज फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक राजीव जैन, महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पुणे-मुंबई बनले देशाची फिनटेक राजधानी
फिनटेक क्षेत्रातील महाराष्ट्राच्या योगदानाचा गौरव करताना मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या पुणे आणि मुंबई ही शहरे देशातील फिनटेक इकोसिस्टीमची राजधानी ठरली आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण फिनटेक गुंतवणुकीपैकी एकट्या मुंबईत ६१ टक्के गुंतवणूक झाली आहे. तसेच स्टार्टअप्समध्ये ५९ टक्क्यांची उल्लेखनीय वाढ नोंदवण्यात आली आहे. हाच विकास आता नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या शहरांमध्येही विस्तारण्याची गरज असून लवकरच नागपुरातही बजाज फिनसर्व्हचे कामकाज सुरू होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
याच अनुषंगाने राज्यात उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण केले जात असून महाराष्ट्रातील वाढती औद्योगिक गुंतवणूक राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकट करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पुण्याच्या पायाभूत सुविधांना मिळणार वेग
शहरातील वाहतूक आणि पायाभूत सुविधांचा उल्लेख करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पुढील तीन ते चार वर्षांत पुण्याची ओळख देशातील वेगवान वाहतूक व्यवस्था असलेले आधुनिक शहर म्हणून निर्माण करण्याचे सरकारचे ध्येय आहे. यासाठी अंतर्गत व बाह्य रिंगरोड आणि भुयारी मार्गांचे जाळे वेगाने विणले जात आहे. या संदर्भात पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांना गती दिली जात असून बजाज फिनसर्व्हच्या नव्या संकुलाकडे जाणारे रस्ते आणि उड्डाणपूल इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच कार्यान्वित केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेला बळ – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले की, बजाज समूहाचा शंभर वर्षांचा गौरवशाली वारसा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड या मुख्यालयाच्या माध्यमातून प्रत्यक्षात येत आहे. बजाज फिनसर्व्ह आणि महाराष्ट्र शासनामध्ये झालेल्या ६ हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारामुळे वित्तीय सेवा क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), फिनटेक, इन्शुरटेक आणि डेटा ॲनालिटिक्स यांसारख्या आधुनिक क्षेत्रांमुळे पुण्यातील तरुण पिढीसाठी कौशल्याधारित रोजगाराच्या विपुल संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
७.२ दशलक्ष चौरस फुटांचा पर्यावरणपूरक परिसर
बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांनी प्रास्ताविकात सांगितले की, हा ७.२ दशलक्ष चौरस फुटांचा भव्य परिसर पूर्णपणे शाश्वतता, ऊर्जा व जलसंवर्धन आणि पर्यावरणपूरक संकल्पनेवर आधारित असेल. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी रचना येथे साकारण्यात येईल.