PET-CT Scan in MJPJAY & PM-JAY: महाराष्ट्रातील कर्करोग (Cancer) रुग्णांसाठी राज्य सरकारने अत्यंत मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. कर्करोगाचे अचूक निदान, आजाराचा नेमका टप्पा निश्चित करणे आणि सुरू असलेल्या उपचारांचा प्रभाव तपासण्यासाठी अनिवार्य असलेली PET-CT स्कॅन (PET-CT Scan) ही अत्यंत महागडी तपासणी आता महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत–प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपलब्ध होणार आहे.
आरोग्य विभागाच्या या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीय कर्करोग रुग्णांना खाजगी लॅब किंवा रुग्णालयांमध्ये स्वतःच्या खिशातून हजारो रुपये खर्च करावे लागणार नाहीत. यापूर्वी शासनाने आरोग्य पारदर्शकता आणण्यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये उपचारांचे दर फलक लावणे बंधनकारक केले होते, आता त्याच धर्तीवर कर्करोग निदानाची ही सुविधा योजनेत थेट समाविष्ट करण्यात आली आहे.
६३ उपचार पॅकेजेसमध्ये PET-CT चा समावेश
सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार (GR):
- अतिरिक्त निदान प्रक्रिया (Add-on Diagnostic Procedure): कर्करोग उपचारांशी संबंधित ६३ पॅकेजेसमध्ये पीईटी-सीटी स्कॅनचा समावेश अतिरिक्त निदान प्रक्रिया म्हणून करण्यात आला आहे. पूर्वी केवळ ४४ पॅकेजेसमध्ये ही सोय होती, ती वाढवून आता ६३ करण्यात आली आहे.
- स्वतंत्र निदान प्रक्रिया (Primary Procedure): वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेल्या निवडक १३ प्रकारच्या कर्करोग उपचारांसाठी पीईटी-सीटी स्कॅन ही स्वतंत्र अथवा प्राथमिक निदान प्रक्रिया म्हणून ग्राह्य धरली जाईल.
तपासणीसाठी शासनाने निश्चित केलेले दर
योजनेअंतर्गत PET-CT स्कॅनच्या विविध प्रकारांसाठी शासनाने निश्चित केलेले दर पुढीलप्रमाणे आहेत:
- संपूर्ण शरीर (Whole Body PET-CT): ₹२०,४००
- मेंदू (Brain PET-CT): ₹१४,६५०
- गॅलियम-६८ (Gallium 68): ₹१५,०००
- हृदय (Cardiac PET-CT): ₹९,४००
शासनाचा मुख्य उद्देश असा आहे की, सर्वसामान्यांना दर्जेदार व परवडणारी आरोग्य सेवा मिळावी आणि महागड्या चाचण्यांच्या भीतीपोटी कोणाचाही उपचार रखडू नये. यापूर्वी तपासणीचा खर्च १५ ते २५ हजारांपर्यंत जात असल्याने अनेक रुग्ण ही तपासणी पुढे ढकलत असत, ज्यामुळे कॅन्सर गंभीर टप्प्यात जात असे.
रुग्णालयांसाठी महत्त्वाच्या अटी व नियम
या योजनेचा लाभ रुग्णांपर्यंत सुरक्षित व पारदर्शक पद्धतीने पोहोचवण्यासाठी आरोग्य हमी सोसायटीने काही मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली आहेत:
- संबंधित तज्ज्ञ ऑन्कोलॉजिस्ट (कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर) यांनी तपासणीची वैद्यकीय गरज प्रमाणित करणे आवश्यक आहे.
- योजनेंतर्गत नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयात स्वतःचे पीईटी-सीटी केंद्र (In-house PET-CT Centre), आवश्यक उपकरणे व प्रशिक्षित मनुष्यबळ असणे अनिवार्य आहे.
- तपासणीपूर्वी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या TMS 2.0 पोर्टलवर पूर्वमान्यता (Pre-authorization) घेणे बंधनकारक राहील.
या योजनेच्या विस्तारामुळे ग्रामीण व शहरी भागातील हजारो गरजू कॅन्सर रुग्णांना वेळेत व अचूक उपचार मिळण्यास मदत होणार आहे.