नागपूर: शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि स्टार्टअप अशा सर्वच आघाड्यांवर आजची युवा पिढी देशाचे भविष्य घडवत आहे. तरुणांच्या आकांक्षांना पंख देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, स्टार्टअप इकोसिस्टीम अधिक मजबूत करण्यासाठी युवकांच्या थेट सहभागाने नवी पॉलिसी तयार केली जाईल, असा महत्त्वाचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
नागपुरातील रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘मंथन फॉर युवा’ या युवा महोत्सवात ते बोलत होते. या कार्यक्रमाला नागपूर आणि परिसरातील तब्बल २५ हजारांहून अधिक तरुण-तरुणींनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली होती. नागपुरात आयोजित विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर या युवा मेळाव्याने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले.
ढोल ताशा पथकाचा ऐतिहासिक विश्वविक्रम
महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे प्रतीक असलेल्या ढोल ताशा पथकाने या सोहळ्यात नवा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला. आधार नोंदणीकृत ५८५ ध्वजधारकांनी एकाच वेळी सहभाग नोंदवून ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’मध्ये आपली नोंद केली. यापूर्वी २६० ध्वजधारकांचा विक्रम होता, तो मोडीत काढून हा नवा इतिहास रचण्यात आला. या अभूतपूर्व कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्व वादक व ध्वजधारकांचे विशेष कौतुक केले.
स्टार्टअप्ससाठी सर्वसमावेशक धोरण आणि संविधानाची ताकद
आपल्या राजकीय व सामाजिक वाटचालीचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, भारतीय संविधानाने दिलेल्या समान संधींमुळेच एका सामान्य कार्यकर्त्याला नगरसेवक, महापौर, आमदार आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचता आले. आजच्या नव्या युगात तरुणांनी नोकरी मागणारे न बनता नोकऱ्या देणारे बनावे, यासाठी शासन कटिबद्ध आहे.
ज्याप्रमाणे राज्यात उद्योजक आणि स्थानिक उद्योगांना चालना देण्यासाठी पावले उचलली जात आहेत, त्याच धर्तीवर राज्यातील स्टार्टअप्ससाठी अधिक सक्षम इकोसिस्टम धोरण युवकांच्या सूचनांनुसार परिपूर्ण केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
‘स्क्रीन टाईम’ कमी करून मैदानाकडे वळण्याचे आवाहन
सध्याच्या डिजिटल युगात मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये वाढत चाललेल्या मोबाईल व स्क्रीन टाईमबद्दल मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “तरुणांचा स्क्रीन टाईम मर्यादित करून त्यांना खेळाच्या मैदानाकडे व क्रीडा क्षेत्राकडे कसे वळवता येईल, यासाठी तज्ज्ञांशी विचारमंथन करून निश्चित आराखडा तयार करण्यात येत आहे.” तंत्रज्ञानाचा योग्य व सकारात्मक वापर झाला पाहिजे, मात्र प्रत्यक्ष मैदानी कौशल्येही तितकीच महत्त्वाची आहेत, यावर त्यांनी भर दिला.
युवा आयकॉन्सशी संवाद आणि नशामुक्त भारताची शपथ
कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध क्रीडा समालोचक रिधिमा पाठक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू तिलक वर्मा, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता दिलीप महादू गावित, तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे आणि किरण शहाजी यांच्याशी संवाद साधला. या दिग्गजांनी आपल्या जीवनप्रवासातील अनुभव कथन करून तरुणांना प्रेरित केले.
याच व्यासपीठावरून ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत अमली पदार्थविरोधी शपथ देण्यात आली. अमली पदार्थांचे सेवन अथवा विक्री खपवून न घेण्याचा आणि व्यसनमुक्त सशक्त पिढी घडवण्याचा संकल्प हजारो तरुणांनी केला. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी उपस्थित तरुणाईला ही शपथ दिली. या यशस्वी आयोजनाबद्दल संयोजकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.