पुणे: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान आणि स्वच्छ ऊर्जा यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आज जागतिक अर्थव्यवस्थेचे चित्र वेगाने बदलत आहे. या बदलत्या काळानुसार विद्यापीठांनी केवळ आजच्याच नव्हे, तर भविष्यात निर्माण होणाऱ्या नवनवीन संधींसाठी विद्यार्थ्यांना सज्ज केले पाहिजे. केवळ पुस्तकी शिक्षणावर भर न देता, शिक्षणासोबत प्रत्यक्ष कौशल्यांचे एकत्रिकरण करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आपले तरुण केवळ ‘नोकरी शोधणारे’ न राहता ‘नोकरी देणारे’ (उद्योजक) बनतील, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
पुण्यातील हॉटेल हयात येथे डिजीआयआय १०० एक्स महाराष्ट्र (DGII 100X Maharashtra) आणि सिम्बायोसिस इंटरनॅशनल विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित विशेष संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
कौशल्याधारित शिक्षण आणि उद्योजकतेला चालना
राज्यपाल वर्मा म्हणाले की, प्रत्येक विद्यापीठ परिसर हे आता नाविन्यतेचे (Innovation) केंद्र बनले पाहिजे. यासाठी विद्यापीठांनी कौशल्य-आधारित अभ्यासक्रमांवर अधिक भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवण्यापुरते मर्यादित न राहता, पदवी पूर्ण करण्यापूर्वी प्रत्यक्ष कामाचा व्यावहारिक अनुभव (Internship/Apprenticeship) घेणे गरजेचे आहे. जोपर्यंत आपली तरुण पिढी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांनी सुसज्ज होत नाही, तोपर्यंत देशाच्या युवा लोकसंख्येचा आपल्याला पूर्ण फायदा उठवता येणार नाही.
या कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी, सिम्बायोसिसच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, उच्च शिक्षण विभागाचे अप्पर सचिव आनंदराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कृषी-पर्यटन आणि सांस्कृतिक वारशातून रोजगार निर्मिती
महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा उल्लेख करत राज्यपाल म्हणाले की, राज्यात पर्यटनाच्या क्षेत्रात रोजगाराच्या अथांग संधी उपलब्ध आहेत. वारसा जतन, डिजिटल तंत्रज्ञान आणि स्थानिक संस्कृती यांचे उत्तम एकत्रीकरण केल्यास पर्यटन हा राज्याच्या आर्थिक विकासाचा मोठा स्त्रोत बनू शकतो.
आपल्या पारंपरिक लोककला, हस्तकला, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि कृषी क्षेत्रातील विविधतेचा वापर करून ‘कृषी-पर्यटन’ (Agro-Tourism) संकल्पनेला प्रोत्साहन दिल्यास ग्रामीण भागात हजारो शाश्वत उपजीविकेची साधने निर्माण होऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
पारंपरिक शिक्षण पद्धती बदलण्याची गरज: चंद्रकांत पाटील
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले की, जर आपली विद्यापीठे जुन्या आणि पारंपरिक पद्धतींनीच शिकवत राहिली, तर देशाची प्रगती खुंटेल. उद्योगांना (Industries) आज ज्या कौशल्यांची आवश्यकता आहे, तेच शिक्षण विद्यार्थ्यांना देणे काळाची गरज आहे. खाजगी विद्यापीठांनी देखील अधिक आधुनिक शिक्षण पद्धतीचा स्वीकार करून विकासाभिमुख दृष्टिकोन ठेवला पाहिजे.
जागतिक पातळीवर महाराष्ट्राचा दबदबा निर्माण करणार: ‘मित्रा’चा पुढाकार
‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन’ (MITRA) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी सांगितले की, राज्यपाल महोदयांच्या सूचनेनुसार राज्यातील विद्यापीठांचा दर्जा जागतिक स्तरावर नेण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती विद्यापीठे आणि सीओईपी (COEP) येथे उच्च क्षमता केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. पुढील २ ते ३ वर्षांत महाराष्ट्रातील किमान ६ विद्यापीठे जागतिक क्रमवारीत आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
नवी मुंबईत उभारणार ‘इंटरनॅशनल एज्युसिटी’
राज्यात दर्जेदार शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी आणि ग्रामीण व आदिवासी भागातील मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राने उच्च शिक्षणामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त ग्रॉस एन्लरॉलमेंट रेशो (GER) साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच, नवी मुंबईत उभारली जाणारी अत्याधुनिक ‘इंटरनॅशनल एज्युसिटी’ ही जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस आणि संशोधन केंद्रांनी सुसज्ज असेल, ज्यामुळे महाराष्ट्राची ओळख उच्च शिक्षणाचे जागतिक हब म्हणून निर्माण होईल, असेही यावेळी सांगण्यात आले.