विकसित भारत २०४७ साठी कौशल्यपूर्ण आणि तंत्रज्ञानसज्ज युवक हीच काळाची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: विकसित भारताचे (Viksit Bharat 2047) स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशातील तरुण पिढीला आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आणि कौशल्यपूर्ण बनवणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सेमीकंडक्टर आणि क्वांटम कॉम्प्युटिंग सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे येत्या काळात नोकऱ्यांचे स्वरूप पूर्णपणे बदलणार आहे. या वेगाने होणाऱ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी युवकांना योग्य कौशल्ये आणि प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे आयोजित ‘वाय४डी’ (Youth for Development) संस्थेच्या ‘इंडिया @ २०४७ – पॉवर ऑफ स्किल अँड एज्युकेशन’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, वाय४डीचे अध्यक्ष प्रफुल निकम आणि विविध उद्योग समूहांचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते.

कृषी क्षेत्रासाठी ‘महाविस्तार’ ॲप ठरणार उपयुक्त

या कार्यक्रमात तंत्रज्ञानाचा थेट फायदा तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून राज्य सरकारने ‘महाविस्तार’ हे अत्यंत उपयुक्त मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपद्वारे लाखो शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन, हवामानाचा अंदाज, कीड नियंत्रण आणि सिंचनाविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली जात आहे. हे ॲप बहुभाषिक असून, शेतकऱ्यांना त्यांच्या स्थानिक भाषेत अचूक माहिती पुरवून शेती अधिक शाश्वत बनवण्यास मदत करत आहे.

याशिवाय, तंत्रज्ञान आणि नवसंशोधनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली असून, महाराष्ट्रात लवकरच लागू होणार ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण जाहीर करण्यात आले आहे, ज्यामुळे तांत्रिक आणि औद्योगिक विकासाला मोठी गती मिळणार आहे.

भारताची तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याकडे वाटचाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत आज जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला असून, लवकरच तिसरे स्थान मिळवण्याच्या मार्गावर आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. देशातील २५ कोटी नागरिकांना गरिबीबाहेर काढण्यात यश आले आहे. पायाभूत सुविधांचा विकास, घरकुल योजना, स्वच्छता आणि रोजगाराच्या नवीन संधींमुळे देशाचा सर्वसमावेशक विकास होत आहे.

महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या ध्येयामध्ये कौशल्य विकासाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पुढील १,००० दिवसांत जवळपास ७० टक्के नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार आहे. त्यामुळे शासन, उद्योग जगत आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन तरुणांना भविष्यातील रोजगारासाठी सक्षम करणे गरजेचे आहे.

तसेच, मुंबईच्या विकासाचा आणि तांत्रिक प्रगतीचा उल्लेख करताना, नुकतीच मुंबईत उभारणार जागतिक दर्जाचे ‘मीडिया हब’ या प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी मालाड येथील जागेसाठी मंजुरी दिली आहे, ज्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.

CSR च्या माध्यमातून सामाजिक क्रांती आणि ‘इम्पॅक्ट रिपोर्ट’

गेल्या ११ वर्षांत ‘वाय४डी’ (Y4D) संस्थेने जलसुरक्षा, आरोग्य आणि कौशल्य विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. केवळ सामंजस्य करार करण्यापेक्षा, प्रत्यक्षात झालेल्या कामाचे मोजमाप करून ‘इम्पॅक्ट रिपोर्ट’ सादर करण्याची वाय४डीची संकल्पना अतिशय अभिनव आहे. इतर कंपन्यांनी आणि सीएसआर भागीदारांनीही या पारदर्शक पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

या कार्यक्रमात विविध उद्योग समूहांच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या प्रगती अहवालांचे प्रकाशन करण्यात आले आणि समाजोपयोगी कार्य करणाऱ्या संस्थांचे मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले.

Top Posts

आनंदाची बातमी! नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला ‘राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार’ दर्जा घोषित

अधिक वाचा

FYJC Admission 2026: इयत्ता अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी जाहीर! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक आणि महत्त्वाच्या तारखा

अधिक वाचा

महाराष्ट्राचा कायापालट! पायाभूत सुविधांचे प्रकल्प वेळेत पूर्ण करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडक निर्देश

अधिक वाचा

मुंबईतील लोकभवन येथे तेलंगणा राज्य स्थापना दिन उत्साहात साजरा; राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची प्रमुख उपस्थिती

अधिक वाचा

ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन; ‘विकासाभिमुख नेतृत्व हरपले’, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

अधिक वाचा