मुंबई: महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाकडे वाटचाल करताना राज्य शासनाने आता हरित आणि शाश्वत विकासावर (Green & Sustainable Development) भर दिला आहे. ‘इंडिया स्टेट क्लायमेट इन्व्हेस्टमेंट फोरम’ (ISCIF) अंतर्गत राज्यातील स्वच्छ ऊर्जा, हरित उद्योग, शाश्वत शेती आणि कार्बन व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांत अब्जावधी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या ऐतिहासिक पावलांमुळे राज्यातील शेती पायाभूत सुविधा मजबूत होऊन मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे.
शेतकऱ्यांसाठी १०० सौर सूक्ष्म शीतगृहे (Solar Micro Cold Storages)
राज्यातील फळे आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे काढणीपश्चात होणारे नुकसान टाळण्यासाठी महाप्रीत (MAHAPREET) आणि सुगम-सीएसएस यांच्या संयुक्त भागीदारीतून १०० सौरऊर्जेवर चालणारी सूक्ष्म शीतगृहे उभारली जाणार आहेत. प्रमुख फळ-भाजीपाला क्लस्टर्समध्ये ही शीतगृहे सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांना त्यांचा माल सुरक्षित ठेवता येईल आणि बाजारात चांगला भाव मिळेपर्यंत साठवणूक करता येईल.
याशिवाय, ‘आयकार्ट’ आणि ‘आयकार्ट राईज फाउंडेशन’ यांच्या सहकार्याने शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) आणि शेतकरी गटांच्या ५० सूक्ष्म शीतगृहांना थेट बाजारपेठेशी जोडण्याचे काम केले जात आहे. ग्रामीण भागात शेतीपूरक हरित तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी शासन विविध योजना राबवत असून, शेतकरी बांधव बायोगॅस संयंत्र योजनेचा लाभ घेऊनही आपल्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करू शकतात.
कृषी सौर ऊर्जा आणि ई-वाहतूक प्रकल्पांना चालना
स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात कृषी सौर ऊर्जीकरण आणि विकेंद्रित सौर प्रकल्पांसाठी सुमारे ५० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (सुमारे ४०० कोटींहून अधिक रुपये) गुंतवणुकीस गती मिळाली आहे. महावितरणच्या कृषी फिडर सोलरायझेशन अंतर्गत विकासकांसोबत करार प्रक्रिया सुरू आहे.
तसेच, राज्यातील शहरांमधील मालवाहतूक आणि प्रवासी वाहनांचे विद्युतीकरण (EV) करण्यासाठी ‘सीकेर्स फायनान्स’ने १ अब्ज रुपयांपर्यंत वित्तपुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे व्यावसायिक इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर आणि फोर-व्हीलर वाहनांच्या वापराला प्रोत्साहन मिळेल.
विदर्भात १८ बायोमास गॅसिफिकेशन प्रकल्प; मायक्रोसॉफ्टसोबत करार
कार्बन रिमूव्हल (Carbon Removal) क्षेत्रात ‘वराह’ कंपनीने १०० कोटी रुपयांच्या प्रारंभिक गुंतवणुकीसह पुढील तीन वर्षांत १,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले आहे. या अंतर्गत विदर्भात १८ बायोमास गॅसिफिकेशन प्रकल्प उभारले जातील. या प्रकल्पांमधून पुढील १५ वर्षांत तब्बल २० लाख टनांहून अधिक कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची क्षमता निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पातून मिळणारे १ लाख टनांहून अधिक ‘बायोचार कार्बन क्रेडिट्स’ खरेदी करण्यासाठी दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टसोबत (Microsoft) करार करण्यात आला आहे.
ज्याप्रमाणे नुकतीच परभणी गुंतवणूक परिषदेत मोठी गुंतवणूक आकर्षित झाली, त्याच धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्रात विविध हरित प्रकल्पांमुळे विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे.
शाश्वत विमान इंधन (SAF) आघाडी
महाराष्ट्राला ‘शाश्वत विमान इंधन’ (Sustainable Aviation Fuel – SAF) निर्मितीचे प्रमुख केंद्र बनवण्यासाठी ‘महाराष्ट्र एसएएफ आघाडी’ स्थापन करण्याचे काम सुरू आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत ही आघाडी कार्यरत होण्याची अपेक्षा आहे.
या सर्व गुंतवणुकांमुळे महाराष्ट्राची हरित अर्थव्यवस्था अधिक बळकट होऊन शेतकरी, उद्योजक आणि सर्वसामान्य तरुणांसाठी प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.