नाशिक: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे विचार आणि साहित्य हे केवळ शब्दांची गुंफण नसून सामाजिक परिवर्तनाची एक मोठी चळवळ आहे. कष्टकरी, शोषित, भटके-विमुक्त आणि उपेक्षित घटकांच्या वेदनांना आपल्या प्रभावी लेखणीतून वाचा फोडण्याचे महान कार्य त्यांनी केले. श्रमाला खरी प्रतिष्ठा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे अण्णाभाऊंचे विचार आजही समाजाला योग्य दिशा देणारे आहेत, असे गौरव उद्गार राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी काढले.
नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम आणि त्यांच्या भव्य पूर्णकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. राज्यभरात ठिकठिकाणी अण्णाभाऊंची जयंती उत्साहात साजरी होत आहे. काही दिवसांपूर्वीच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त पुण्यातही भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
जागतिक स्तरावर अण्णाभाऊंच्या साहित्याची दखल
मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, अण्णा भाऊ साठे यांना अल्प आयुष्य लाभले असले, तरी त्यांनी निर्माण केलेले साहित्यविश्व अजरामर आहे. त्यांनी ३५ हून अधिक कादंबऱ्या, कथा, पोवाडे, लावण्या आणि लोकनाट्यांची रचना केली. त्यांची प्रसिद्ध ‘फकीरा’ कादंबरी ही अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचे प्रतीक मानली जाते. त्यांच्या साहित्याचे रशियन भाषेशह अनेक परदेशी भाषांमध्ये भाषांतर झाले असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या प्रतिभेचा गौरव झाला आहे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊंनी शाहीर अमर शेख, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, प्रबोधनकार ठाकरे आणि आचार्य अत्रे यांच्यासोबत मिळून आपल्या शाहिरीच्या माध्यमातून लोकजागृती केली. “माझी मैना गावावर राहिली” या पोवाड्याने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
वंचित आणि मातंग समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध : गिरीश महाजन
कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनीही आपले विचार मांडले. “अण्णाभाऊ साठे हे कोणत्याही एका जातीपुरते मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीला समानतेचा संदेश देणारे क्रांतीसूर्य होते. महापुरुषांचे विचार आणि कार्य सर्व समाजासाठी दिशादर्शक असतात,” असे महाजन म्हणाले.
नाशिक महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध विकासकामे पूर्ण केली जात आहेत. मातंग समाजातील महिलांच्या पुनर्वसनासाठी व मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी शासन तत्पर आहे. राज्य सरकारकडून ज्याप्रमाणे मूलभूत सुविधांवर भर दिला जात आहे, त्याचप्रमाणे इतर विकासात्मक योजनांसाठीही मोठा निधी उपलब्ध होत आहे. अलीकडेच केंद्र सरकारने महाराष्ट्राला ७ हजार २२ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला असून यामुळे राज्यातील विविध विकासकामांना गती मिळत आहे.
या मान्यवरांची होती उपस्थिती
या सोहळ्याला नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके-आहेर, आमदार देवयानी फरांदे, आमदार हिरामण खोसकर, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, उत्सव समितीचे अध्यक्ष विनायक पांडे, उपमहापौर विलास शिंदे, मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह अनेक राजकीय नेते, नागरिक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दाखवलेल्या समता, बंधुभाव आणि शिक्षणाच्या मार्गावर चालणे हीच त्यांना दिलेली खरी आदरांजली ठरेल, असा सूर या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.