अमरावती: आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती विभागातील सर्व पाचही जिल्ह्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी दिले आहेत. पुरामुळे संपर्क तुटणाऱ्या आणि दुर्गम आदिवासी भागातील गावांमध्ये तातडीने मदत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २४ तास सतर्क राहून प्रभावी नियोजन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात मान्सून पूर्वतयारी आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अपर आयुक्त संजय जाधव, कृषी सहसंचालक गणेश घोरपडे प्रत्यक्ष उपस्थित होते, तर पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व संबंधित विभागांचे प्रमुख व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले गेले होते.
आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि बचाव पथके २४ तास कार्यरत राहणार
विभागीय आयुक्त श्रीमती गुंडे म्हणाल्या की, अतिवृष्टी किंवा पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना तातडीने मदत मिळणे आवश्यक आहे. यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष, मदत पथके आणि संपर्क यंत्रणा २४ तास कार्यान्वित ठेवण्यात यावी. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संपर्क क्रमांक विविध माध्यमांद्वारे जाहीर करावेत.
पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांसाठी सुरक्षित ठिकाणी निवारा, भोजन व्यवस्था, अन्नधान्य आणि औषध साठा आधीच तयार ठेवावा. तसेच SDRF आणि NDRF च्या बचाव पथकांना बोटी, लाईफ जॅकेट्स, दोरखंड आणि इतर शोध साहित्यांसह सुसज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. ग्रामीण भागात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाच्या विविध योजना कार्यरत आहेत. नुकत्याच सुरू झालेल्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत ग्रामीण आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यावर भर दिला जात आहे.
आरोग्य यंत्रणा आणि पायाभूत सुविधांचा आढावा
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी जलस्रोतांची तपासणी करावी. सर्पदंश आणि विंचूदंश यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक इंजेक्शन्स व औषधसाठा उपलब्ध ठेवावा. दुर्गम आदिवासी भागातील गरोदर मातांची विशेष काळजी घेण्यासाठी जवळच्या आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा आधीच उपलब्ध करून ठेवाव्यात.
- महावितरणचे नियोजन: वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास तो तातडीने सुरळीत करण्यासाठी महावितरणने सज्ज राहावे.
- जलाशयांचे नियंत्रण: धरणातून पाणी सोडताना पोलीस, तहसीलदार आणि नियंत्रण कक्षाला २४ तास आधी पूर्वसूचना देणे बंधनकारक राहील.
- ब्रिटीशकालीन तलाव व दुरुस्ती: जिल्हा परिषद व जलसंधारण विभागाने जुन्या तलावांतील गाळ काढणे आणि पूर संरक्षण भिंतींची दुरुस्ती तातडीने करून घ्यावी.
- दामिनी ॲपचा वापर: वीज कोसळण्याच्या पूर्वसूचना मिळण्यासाठी नागरिकांनी ‘दामिनी ॲप’चा वापर करावा, यासाठी जनजागृती करण्यात यावी.
खरीप हंगाम आणि कृषी विभागाची पूर्वतयारी
या महत्त्वपूर्ण बैठकीत केवळ आपत्ती व्यवस्थापनच नव्हे, तर आगामी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. मान्सूनच्या आगमनासोबत शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांची टंचाई भासू नये यासाठी कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन केले आहे. या संदर्भात, विभागात खरीप २०२६ चे चोख नियोजन करण्यात आले असून, खते व बियाण्यांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी सर्व विभागांना समन्वय ठेवून काम करण्याचे आवाहन केले असून, हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.