मुंबई: भगवान महावीरांनी जगाला दिलेली सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्याची महान शिकवण ही केवळ एका धर्मापुरती मर्यादित नसून शांततापूर्ण, न्यायप्रिय आणि निकोप मानवी समाजाच्या निर्मितीचा खरा पाया आहे. आज संपूर्ण जग संघर्ष, युद्ध आणि सामाजिक विभाजनाच्या विळख्यात सापडले असताना अहिंसा, क्षमा आणि मैत्रीचा संदेश अधिक प्रासंगिक ठरत आहे. त्यामुळे क्षमापना आणि विश्व मैत्रीचा संदेश एका समाजापुरता न राहता संपूर्ण मानवतेचा उत्सव बनावा, असे आग्रही प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.
भारत जैन महामंडळाच्या वतीने मुंबईतील घाटकोपर (पूर्व) येथील आराध्य भक्ती पार्क डोम येथे सामूहिक क्षमापना, विश्व मैत्री दिवस आणि ‘जैन समाज रत्न’ अलंकरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते.
अनेकांतवाद आणि क्षमाशीलतेचे सामर्थ्य
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जैन दर्शनातील ‘अनेकांतवाद’ ही संकल्पना आपल्याला सत्याचे विविध पैलू समजून घेण्याची दृष्टी देते. मतभेदांचा आदर राखणे आणि सौहार्दपूर्ण संवादातून तोडगा काढणे ही जागतिक शांततेच्या दिशेने टाकलेली पावले आहेत. आपली चूक उमजून इतरांची क्षमा मागणे हे दुबळेपणाचे नव्हे, तर आत्मिक ताकदीचे लक्षण आहे, म्हणूनच ‘क्षमा वीरस्य भूषणम्’ ही उक्ती क्षमेचे सर्वश्रेष्ठ स्थान दर्शवते.
तसेच, अहिंसा आणि करुणेचा संदेश केवळ मानवी नात्यांपुरता मर्यादित नसून संपूर्ण निसर्ग आणि मुक्या प्राणिमात्रांप्रती आदर बाळगण्यास शिकवतो. भगवान महावीरांच्या विचारांचा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनदर्शनावरही मोठा प्रभाव होता, असेही राज्यपालांनी स्पष्ट केले. याप्रसंगी त्यांनी भारत जैन महामंडळाच्या १२६ वर्षांच्या सेवाभावी कार्याचा गौरव केला.
शासकीय योजना आणि दुष्काळ निवारणात लोकसहभागाची गरज: मंगलप्रभात लोढा
या कार्यक्रमात उपस्थित कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन बांधवांना सामाजिक कार्यात एकत्र येण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, जैन समाजातील अनेक दानशूर व्यक्ती स्वतंत्रपणे मोठे कार्य करीत आहेत. मात्र आता आयुष्मान भारत, तलाव स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या मोहिमांमध्ये समाजाने सामूहिक शक्ती दाखवणे आवश्यक आहे.
राज्यातील विविध भागांमधील पाणीटंचाई आणि संकटांचा उल्लेख करताना मंत्री लोढा म्हणाले की, संकटकाळात नागरिकांना पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा पुरवण्यासाठी समाजाने पुढे आले पाहिजे. ज्याप्रमाणे विविध भागांमध्ये दुष्काळग्रस्त भागात रोजगारनिर्मिती आणि जलसंधारणाची कामे गतीने राबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, त्याच धर्तीवर सामाजिक संस्थांची मदत मोलाची ठरते. याशिवाय ग्रामीण व शहरी भागात दुष्काळमुक्तीसाठी दुष्काळमुक्तीसाठी लोकसहभागाची गरज अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
मान्यवरांना ‘जैन समाज रत्न’ पुरस्काराने सन्मानित
उद्योग, समाजकल्याण आणि जनकल्याणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते ‘जैन समाज रत्न’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये आमदार पराग शाह, सुखराज नाहर, कैलाशचंद जैन आणि सुरेश गोयल यांचा समावेश होता.
या सोहळ्यास मुंबईच्या माजी महापौर रितू तावडे, भारत जैन महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ख्यालीलाल तातेड, शिवलाल पोखरणा, पूज्य मुनिराज मुक्त निलय विजय, आचार्य साध्वी श्री योगक्षेम प्रभा, राष्ट्रसंत गुरुदेव श्री नम्रमुनी यांच्यासह जैन संत, मुनी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन युवा अध्यक्ष भुपेश कोठारी यांनी केले.