नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरासह उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांवर लाखो भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र सप्तशृंग गड (ता. कळवण) येथे गर्दी व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, पिण्याचे पाणी, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन तसेच आरोग्य विषयक मूलभूत सुविधांचे आतापासूनच सूक्ष्म व ठोस नियोजन करावे, असे स्पष्ट निर्देश नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.
कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने सप्तशृंग गडावर २०२७ च्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, उपवनसंरक्षक राकेश सेपट, धर्मादाय सहआयुक्त तथा ट्रस्टचे अध्यक्ष विवेक सोनुने यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
केवळ मुख्य कुंभक्षेत्र नव्हे, तर परिसरातील तीर्थक्षेत्रांचेही व्यापक नियोजन
आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून कोट्यवधी भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे हजेरी लावतात. यातील बहुसंख्य भाविक आदिशक्तीचे स्वयंभू पीठ असलेल्या सप्तशृंग गडाला आवर्जून भेट देतात. त्यामुळे केवळ मूळ कुंभमेळा परिसरावर लक्ष केंद्रित न करता, परिसरातील महत्त्वपूर्ण धार्मिक व आध्यात्मिक स्थळांचा सर्वांगीण विकास आणि गर्दी नियंत्रण आराखडा तयार केला जात आहे.
नवरात्रोत्सवाच्या काळात स्थानिक प्रशासनाला गर्दी हाताळण्याचा दांडगा अनुभव असतो; मात्र कुंभमेळ्यातील वाढीव गर्दीचे स्वरूप अधिक व्यापक असल्याने अतिरिक्त मनुष्यबळ, सुसज्ज वाहने, पार्किंग व्यवस्था आणि सुरक्षित ये-जा करण्यासाठी स्वतंत्र मार्ग विकसित करणे आवश्यक आहे.
कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणाचे रक्षण
सप्तशृंग गडावरील पवित्रता आणि नैसर्गिक सौंदर्य अबाधित राखण्यासाठी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनावर विशेष भर दिला जाणार आहे. कुंभमेळ्याच्या काळात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा अंदाज घेण्यासाठी बेसलाइन डेटा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- शास्त्रोक्त विल्हेवाट: ओला व सुका कचरा संकलनासाठी अतिरिक्त डस्टबिन, कचरा वाहक वाहने आणि तात्पुरत्या प्रक्रिया प्रकल्पांची उभारणी केली जाईल.
- निर्माल्य प्रक्रिया: मंदिरात जमा होणाऱ्या निर्माल्यापासून अगरबत्ती, धूपबत्ती किंवा सेंद्रिय खत तयार करणाऱ्या स्टार्टअप्स आणि संस्थांची मदत घेतली जाईल.
- पर्यावरण संवर्धन: सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या या क्षेत्राचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी वनसंपदेच्या शाश्वत व्यवस्थापनातून जैवविविधता संवर्धन करणे आणि प्लास्टिकमुक्तीवर भर देणे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट राहील.
आरोग्य यंत्रणा आणि पायाभूत सुविधांचा विकास
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी गडावर तात्पुरती रुग्णालये, फिरती वैद्यकीय पथके, २४ तास रुग्णवाहिका आणि औषधसाठा उपलब्ध केला जाणार आहे. राज्यभरात ज्याप्रमाणे शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कायापालटासाठी जिल्हानिहाय कालबद्ध मोहीम राबवली जात आहे, त्याच धर्तीवर सप्तशृंग गडावरही कायमस्वरूपी दर्जेदार प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) विकसित करण्याबाबत देवस्थान ट्रस्ट आणि आरोग्य विभागामध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ९ विकासकामे प्रस्तावित
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गड परिसरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी ९ महत्त्वपूर्ण कामांचे प्रस्ताव मांडण्यात आले आहेत. यामध्ये रस्त्यांचे रुंदीकरण, घाट रस्त्यांचे मजबुतीकरण, वणी व नांदुरी परिसरातील पाणीपुरवठा योजना, तसेच तात्पुरती व फिरती स्वच्छतागृहे उभारणीचा समावेश आहे. सर्व संबंधित विभागांनी आपापसांत समन्वय ठेवून ही कामे विहित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देशही शेवटी देण्यात आले.