मुंबई: राज्यातील कुपोषित बालकांमध्ये क्षयरोगाचे (टीबी) वेळीच निदान करून त्यांना तातडीने योग्य व प्रभावी उपचार उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये (NRC – Nutritional Rehabilitation Centers) दाखल होणाऱ्या बालकांसाठी टीबी तपासणीची कार्यपद्धती अधिक गतिमान आणि बळकट करण्यात आली आहे. कुपोषणामागील एक प्रमुख कारण क्षयरोग असू शकतो, हे लक्षात घेऊन शासनस्तरावर विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी शासन विविध स्तरांवर काम करत असून नुकताच आरोग्य विभागात मोठा प्रशासकीय बदल: जिल्हा शल्यचिकित्सक आणि आरोग्य अधिकाऱ्यांचे होणार वस्तुनिष्ठ गुणांकन करण्यात येत आहे, जेणेकरून आरोग्य सेवा तळागाळापर्यंत अधिक कार्यक्षमतेने पोहोचतील.
पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये (NRC) विशेष तपासणी मोहीम
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली महिला आणि बालकांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल होणाऱ्या प्रत्येक बालकाची क्षयरोग तपासणी, प्राथमिक लक्षणे, तसेच त्यांच्या कुटुंबातील किंवा संपर्कातील टीबी रुग्णांचा इतिहास बारकाईने तपासला जातो. आवश्यकतेनुसार बालकांचे नमुने गोळा करून अत्याधुनिक सीबी-नॅट (CB-NAAT) किंवा ट्रूनॅट (Truenat) तपासणी आणि छातीचा डिजिटल एक्स-रे यांसारख्या अत्याधुनिक चाचण्या तातडीने उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
राज्यातील आरोग्य विभागाचा मुख्य उद्देश गोरगरीब व गरजू घटकांना वेळेवर वैद्यकीय मदत पुरवणे हाच आहे. शासनाच्या धोरणानुसार, पैशांअभावी कोणताही रुग्ण उपचाराविना राहणार नाही याची दक्षता सर्वच स्तरांवर घेतली जात आहे.
तपासणीचे प्रमाण ९४ टक्क्यांवर; रुग्णांची संख्या घटली
राज्यातील पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये दाखल बालकांची नियमित टीबी तपासणी सातत्याने वाढवली जात आहे:
- वर्ष २०२१ पासून पोषण पुनर्वसन केंद्रांत दाखल झालेल्या २९,८७५ बालकांपैकी २६,८५७ बालकांची टीबी तपासणी पूर्ण झाली असून, तपासणीचे प्रमाण सुमारे ८९.९ टक्के राहिले आहे.
- चालू वर्षात जुलैअखेर दाखल ३,०१७ बालकांपैकी तब्बल २,८३५ बालकांची यशस्वी तपासणी करण्यात आली असून, हे प्रमाण ९४ टक्क्यांवर पोहोचले आहे.
- सक्रिय तपासणीमुळे वेळेत निदान होऊन बाल टीबी रुग्णांचे प्रमाण २०२२ मधील २३ वरून घटत २०२५ मध्ये ७ आणि चालू वर्षात अवघ्या ३ बालकांपर्यंत खाली आले आहे.
बाल टीबी नियंत्रणासाठी नवे डिजिटल आणि वैद्यकीय उपक्रम
कुपोषित बालकांमध्ये क्षयरोग रोखण्यासाठी खालील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत:
- टीबी प्रतिबंधात्मक उपचार (TPT): टीबी रुग्णांच्या संपर्कात आलेल्या परंतु लक्षणे नसलेल्या बालकांना संसर्गापासून वाचवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपचार दिले जात आहेत.
- बाल टीबी उत्कृष्टता केंद्र: गुंतागुंतीच्या आणि औषध-प्रतिरोधक (Drug-Resistant TB) बालरुग्णांसाठी विशेष उत्कृष्टता केंद्र उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- निक्षय पोर्टलशी डिजिटल जोडणी: केंद्रांमधील सर्व तपासण्यांची माहिती थेट ‘निक्षय’ (Ni-kshay) पोर्टलवर नोंदवली जात आहे, ज्यामुळे उपचारांचा पाठपुरावा व देखरेख डिजिटल पद्धतीने होईल.
- निक्षय पोषण योजना व निक्षय मित्र: क्षयरोग निदान झालेल्या बालकांना अतिरिक्त आहारासाठी निक्षय पोषण योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य आणि निक्षय मित्रांमार्फत पोषण आहार किट्स दिले जात आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग आणि राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम यांच्या संयुक्त समन्वयातून राज्यातील सर्व एनआरसी केंद्रांमध्ये तपासणीचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा जास्त ठेवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.