नेपाळ : नेपाळमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील ‘श्री स्वामी महाराज’ यांच्या समूहासोबत धार्मिक व पर्यटन दौऱ्यासाठी नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले ११० नागरिक पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
या समूहामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग आहे. नेपाळमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीचा या नागरिकांवर कोणताही परिणाम झालेला नाही. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि नागपूर जिल्हा प्रशासन सातत्याने या नागरिकांच्या संपर्कात असून, त्यांच्या आरोग्याची व सद्यस्थितीची नियमित माहिती घेतली जात आहे.
काठमांडू येथील माहेश्वरी भवनात सुरक्षित वास्तव्य
नागपूर जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हे सर्व ११० भाविक काठमांडू येथील माहेश्वरी समाज भवनात सुखरूप वास्तव्यास होते. नेपाळ स्थानिक प्रशासनाने त्यांना आवश्यक ती सर्व मदत, वैद्यकीय सुविधा व अन्नधान्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच नेपाळमध्ये पुरामुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी राज्य सरकार सरसावले; ऑनलाईन लिंक आणि हेल्पलाईन जारी करून आपत्कालीन यंत्रणा सतर्क केली होती.
असा असेल परतीचा प्रवास (काठमांडू ते नागपूर)
पूरस्थितीमुळे रस्ते वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असले तरी नेपाळ प्रशासनाच्या सहकार्याने पर्यायी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे:
- पहिला टप्पा: हे सर्व नागरिक काठमांडू येथून पर्यायी बसेसद्वारे जनकपूर (नेपाळ-भारत सीमा) च्या दिशेने रवाना झाले आहेत.
- दुसरा टप्पा: जनकपूर सीमेवरून भारतात प्रवेश करून हे भाविक बिहारची राजधानी पाटणा येथे पोहोचतील.
- तिसरा टप्पा: पाटणा जवळील दानापूर रेल्वे स्थानकावरून नागपूरसाठी विशेष रेल्वेने त्यांचा प्रवास नियोजित करण्यात आला आहे.
याआधीही राज्य सरकारने तत्परता दाखवत नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या प्रवासाची सोय केली होती; या संदर्भातील सविस्तर वृत्त आपण नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील १०६ भाविकांच्या मदतीला धावले देवेंद्र फडणवीस; काठमांडू ते जनकपूर प्रवासासाठी ४ मिनी बसेसची सोय या वृत्तात वाचू शकता.
नातेवाईकांशी सातत्याने संपर्क व समन्वय
नागपूर जिल्हा प्रशासनाने भाविकांच्या नागपुरातील नातेवाईकांशी थेट समन्वय साधला आहे. इतवारी (प्रेमनगर) आणि मानेवाडा परिसरातील नातेवाईक प्रशासकीय नियंत्रण कक्षाच्या सतत संपर्कात असून, सर्वांचे आप्तेष्ट सुरक्षित असल्यामुळे कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
नागपूरचे जिल्हा प्रशासन, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सीमा भागातील आपत्ती निवारण पथके या भाविकांचा परतीचा प्रवास निर्विघ्न पार पडावा यासाठी २४ तास कार्यरत आहेत.