वर्धा: राज्य राखीव पोलीस बलाचे (SRPF) अत्याधुनिक, हायटेक आणि जागतिक दर्जाचे विशेष प्रशिक्षण केंद्र वर्धा येथे उभारण्यासाठी तातडीने सर्वंकष आराखडा तयार करण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले आहेत. मंत्रालयात आयोजित उच्चस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला राज्य राखीव पोलीस बलाचे अपर महासंचालक राजकुमार व्हटकर, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. वर्मा, मुख्य अभियंता दीपाली भाईक, गृह विभागाचे उपसचिव अजित कवडे, वर्ध्याच्या जिल्हाधिकारी वान्मथी सी., पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दोन हजार जवानांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था
प्रस्तावित विशेष प्रशिक्षण केंद्राबाबत या बैठकीत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. वर्धा येथे तब्बल ३०० एकर विस्तीर्ण जागेवर हे केंद्र साकारले जाणार असून, एकाच वेळी २ हजार प्रशिक्षणार्थी जवानांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याची क्षमता येथे निर्माण केली जाणार आहे.
केंद्राच्या संकुलामध्ये खालील अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना राज्यमंत्र्यांनी दिल्या:
- आधुनिक शैक्षणिक आणि प्रशिक्षण ब्लॉक्स (Academic Blocks)
- अद्ययावत सिम्युलेशन लॅब (Simulation Lab)
- भव्य परेड ग्राउंड आणि ड्रिल एरिया
- क्रीडांगण व विविध अडथळा प्रशिक्षण क्षेत्र (Obstacle Training Area)
- अत्याधुनिक वसतिगृह आणि भोजनालय सुविधा
- सुसज्ज वैद्यकीय केंद्र आणि युटिलिटी झोन
- व्हीआयपी गेस्ट हाऊस, कॉन्फरन्स हॉल आणि भव्य सभागृह
तसेच, पोलीस दलातील सुधारणा आणि प्रशासकीय कामकाजाचा वेग वाढवण्यासाठी राज्यभरात प्रयत्न सुरू आहेत. नुकतेच सांगली जिल्हा कारागृहात आधुनिक मुलाखत कक्षाचे उद्घाटन करण्यात आले होते, त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षा आणि गृह विभागाच्या पायाभूत सुविधांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पावले उचलली जात आहेत.
‘दगडापासून सामर्थ्याकडे’ (Stone to Strength) संकल्पना
या प्रशिक्षण केंद्राची संपूर्ण रचना ‘दगडापासून सामर्थ्याकडे’ (Stone to Strength) या अनोख्या संकल्पनेवर आधारित आहे. ज्याप्रमाणे दगड खाणीतून काढल्यानंतर त्याची कापणी, घडण, तावणे, परीक्षण आणि संस्कार होऊन तो मूर्ती वा वास्तूचे रूप धारण करतो; त्याच धर्तीवर भरती झालेल्या नव्या प्रशिक्षणार्थीला शिस्तबद्ध, कर्तव्यदक्ष आणि सक्षम पोलीस जवान म्हणून घडवण्याचे उद्दिष्ट या केंद्राचे असेल.
विदर्भाच्या विकासाला चालना देण्यासाठी विविध प्रकल्पांचे नियोजन सुरू असून, अलिकडेच यवतमाळ जिल्हा वार्षिक योजनेसाठी ८२१ कोटींचे नियोजन करण्यात आले होते. वर्ध्यातील या महाप्रकल्पामुळे विदर्भातील स्थानिक अर्थव्यवस्थेला व रोजगारालाही हातभार लागणार आहे.
किल्ल्यासारखे भव्य प्रवेशद्वार आणि समृद्धीची कनेक्टिव्हिटी
प्रस्तावित जागा वर्धा शहरापासून सुमारे १० किमी, रेल्वे स्थानकापासून ११ किमी तर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या ७५ किमी अंतरावर आहे. तसेच या केंद्राला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची उत्तम कनेक्टिव्हिटी लाभणार आहे.
प्रशिक्षण केंद्राचे मुख्य प्रवेशद्वार एखाद्या ऐतिहासिक किल्ल्याच्या महाद्वाराप्रमाणे भव्य असावे आणि अंतर्गत मुख्य रस्ता किमान १५ मीटर रुंदीचा असावा, अशा सूचना डॉ. पंकज भोयर यांनी दिल्या. याशिवाय, एसआरपीएफचा गौरवशाली इतिहास आणि शौर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी एक अनुभव केंद्र (Experience Center) आणि आकर्षक संग्रहालय उभारण्याचे नियोजनही प्रकल्पात करण्यात आले आहे.