मुंबई: मुंबईतील ऐतिहासिक आणि महत्त्वाचे मत्स्य बंदर असलेल्या ससून डॉक (Sassoon Dock) चा चेहरामोहरा लवकरच बदलणार आहे. या बंदराच्या डिजिटायझेशन आणि आधुनिकीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी नुकतीच फिनलंडच्या प्रतिनिधींसोबत या संदर्भात एक उच्चस्तरीय बैठक घेतली.
या बैठकीत फिनलंडच्या उप-महावाणिज्यदूत इव्हा निल्सन आणि फिनलंडमधील आघाडीची सुरक्षा व व्हिडिओ व्यवस्थापन तंत्रज्ञान कंपनी ‘मिरासिस’ (Mirasis) चे प्रतिनिधी अरिंदम सरकार उपस्थित होते. या वर्षाच्या सुरुवातीला मुंबईतील फिनलँड वाणिज्य दूतावासासोबत झालेल्या सामंजस्य कराराचा (MoU) आढावा या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खापले यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि स्मार्ट ऑपरेशन्सवर भर
ससून डॉक परिसरात अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था, स्मार्ट ऑपरेशन्स, पर्यावरण व्यवस्थापन आणि मानवी संसाधनांचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी विविध डिजिटल उपाययोजना राबवण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये खालील प्रमुख वैशिष्ट्यांचा समावेश असेल:
- केंद्रीकृत व्हिडिओ मॅनेजमेंट सिस्टीम: सुमारे १८० हून अधिक PTZ, बुलेट आणि ANPR (स्वयंचलित नंबर प्लेट ओळखणारे) कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण डॉक परिसरावर चोवीस तास बारीक लक्ष ठेवले जाईल.
- अपघात नियंत्रण आणि गर्दीचे विश्लेषण: अत्याधुनिक व्हिडिओ तंत्रज्ञानाचा वापर करून बोटींची हालचाल, वाहनांचे व्यवस्थापन, गर्दीचे नियंत्रण आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.
- पारदर्शक डिजिटल लिलाव प्रणाली: मत्स्य व्यवसायातील व्यवहार अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी डिजिटल लिलाव प्रणाली, पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि मोबाइल ॲप आधारित सेवा सुरू केल्या जातील.
राज्यात डिजिटल प्रक्रियेला वेग देण्यासाठी महा-एआय आणि महाडीबीटी २.० च्या माध्यमातून डिजिटल क्रांती घडवून आणली जात आहे. याच धर्तीवर आता मुंबईतील ससून डॉकचे देखील संपूर्ण आधुनिकीकरण केले जात आहे.
ब्लॉकचेन आणि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा
ससून डॉकच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून, त्यासाठी फेस रेकग्निशन (चेहरा ओळखणारी प्रणाली), RFID, बायोमेट्रिक उपस्थिती आणि डिजिटल प्रवेश नियंत्रण यंत्रणा उभारली जाणार आहे. याशिवाय, ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बोटींचे परवाने, मच्छीमारांची ओळखपत्रे आणि निर्यातीसाठी लागणाऱ्या दस्तऐवजांची जलद व सुरक्षित पडताळणी करणे शक्य होणार आहे.
या संपूर्ण प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये हाय-स्पीड ऑप्टिकल फायबर नेटवर्क, आधुनिक सर्व्हर रूम, वाय-फाय आणि अत्याधुनिक कंट्रोल रूमचा समावेश असेल. हे सर्व प्लॅटफॉर्म एकात्मिक डॅशबोर्डद्वारे नियंत्रित केले जातील.
महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान विकासासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. नुकतेच ॲमेझॉनला महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या सुवर्णसंधी मिळाल्या आहेत, ज्यामुळे राज्याच्या डिजिटल पायाभूत सुविधांना मोठा हातभार लागत आहे. आता फिनलंडच्या सहकार्यामुळे ससून डॉक देखील जागतिक दर्जाचे बंदर बनण्यास मदत होईल.
महाराष्ट्राला मत्स्य व्यवसायात देशात अग्रस्थानी नेणार: नितेश राणे
मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा आमचा निर्धार आहे. ससून डॉकसारख्या ऐतिहासिक बंदराचे आधुनिकीकरण केल्याने आपल्या स्थानिक मच्छीमारांना उत्तम दर्जाच्या सोयी-सुविधा, उत्तम सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील.”
फिनलंडच्या प्रतिनिधींनीही या प्रकल्पासाठी तांत्रिक सहकार्य देण्याची सकारात्मक तयारी दर्शवली असून, यामुळे ससून डॉकच्या विकासाला आता नवी गती मिळणार आहे.