ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (GCC) क्षेत्रात पुणे देशात अव्वल ठरणार; मॅग्नमच्या केंद्रामुळे १,००० हून अधिक रोजगारांची निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे शहर हे केवळ राज्याची सांस्कृतिक किंवा शैक्षणिक राजधानी राहिले नसून आता तंत्रज्ञान आणि जागतिक कॉर्पोरेट विश्वाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयाला येत आहे. ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (GCC) क्षेत्रात पुणे शहर वेगाने आघाडी घेत असून, आगामी एका वर्षात शहरातील या केंद्रांची संख्या ८०० च्या पार जाईल आणि पुणे या क्षेत्रात देशात प्रथम क्रमांकावर पोहोचेल, असा ठाम विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

वाकड येथील ईओएन वेस्ट (EON West) आयटी पार्कमध्ये मॅग्नम आईस्क्रीम कंपनीच्या अत्याधुनिक ‘ग्लोबल बिझनेस सोल्युशन्स सेंटर’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला आमदार अमित गोरखे, शंकर जगताप, उद्योग व गुंतवणूक विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्यासह मॅग्नम कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

१ हजारांहून अधिक थेट रोजगारांची निर्मिती

पुण्यात सुरू झालेल्या मॅग्नमच्या या जागतिक केंद्रातून तब्बल १,००० हून अधिक कुशल मनुष्यबळाला थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर अप्रत्यक्ष रोजगारालाही चालना मिळणार आहे. या केंद्रात कंपनीच्या जागतिक कामकाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), स्वयंचलित तंत्रज्ञान (Automation) आणि अत्याधुनिक लॉजिस्टिक्स प्रणालीचा प्रभावी वापर केला जाणार आहे. उत्पादन, वितरण आणि ग्राहक अनुभवाशी निगडित प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी हे केंद्र जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावेल.

पुण्यातील उद्योगस्नेही वातावरण आणि कुशल तरुणाई यामुळे आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा ओढा सातत्याने या शहराकडे वाढत आहे. यापूर्वीही पुण्यात बजाज फिनसर्व्हचे अत्याधुनिक मुख्यालय सुरू झाले असून, त्यातून तब्बल ४० हजार नवीन रोजगार निर्माण होत आहेत. आता मॅग्नमच्या नव्या केंद्रामुळे या औद्योगिक वैभवात आणखी भर पडली आहे.

आयटी क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले की, मुंबईतील प्रादेशिक मुख्यालयासोबतच पुण्यात सुरू झालेले हे केंद्र महाराष्ट्राच्या उद्योग विश्वाला नवी दिशा देईल. हिंजवडीसह पुण्यातील संपूर्ण आयटी परिसरामध्ये वाहतूक आणि अन्य मूलभूत पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी शासन वेगाने काम करत आहे. या संदर्भात नुकत्याच झालेल्या आढाव्यात पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांना मिळणार गती यासाठी प्रशासनाला स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात ७०० हून अधिक जीसीसी युनिट्स उभारण्याचे लक्ष्य

उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन यांनी नमूद केले की, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स ही देशाच्या आर्थिक प्रगतीला चालना देणारी इंजिने आहेत. गेल्या १५ महिन्यांत पुण्यात या क्षेत्रासाठी सुमारे ६० लाख चौरस फूट जागेची मागणी नोंदवली गेली आहे. आगामी काळात राज्यात ४०० जीसीसी कंपन्या आणि ७०० हून अधिक युनिट्स उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, जागतिक कंपन्यांना शासन सर्वतोपरी सहकार्य करत आहे.

मॅग्नमचे मुख्य वित्तीय अधिकारी अभिजीत भट्टाचार्य यांनी महाराष्ट्र शासनाच्या तत्पर आणि उद्योगपूरक धोरणांचे कौतुक केले. भविष्यात शाश्वत दुग्धव्यवसाय आणि दुग्ध उत्पादन क्षेत्रातही महाराष्ट्रासोबत भागीदारी करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Top Posts

भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारात महाराष्ट्र बजावणार महत्त्वाची भूमिका; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली ‘मुंबई-अँटवर्प’ भागीदारीची संकल्पना

अधिक वाचा

पशुधन विमा योजना: जनावरांचा मृत्यू झाल्यास सरकार देणार ८५% विमा भरपाई; असा मिळवा लाभ!

अधिक वाचा

ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (GCC) क्षेत्रात पुणे देशात अव्वल ठरणार; मॅग्नमच्या केंद्रामुळे १,००० हून अधिक रोजगारांची निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अधिक वाचा

गडचिरोलीत साकारणार देशातील पहिला हरित पोलाद प्रकल्प; बेल्जियमच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत ऐतिहासिक सामंजस्य कराराची देवाणघेवाण

अधिक वाचा

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात रंगणार भव्य गणेशोत्सव सोहळा; राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांना मानाचे निमंत्रण

अधिक वाचा