मुंबई: मुंबईतील जोगेश्वरी आणि गोरेगाव परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) प्रकल्पांमध्ये मूळ व पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्र व्यक्तींना सदनिकांचे वाटप केल्याच्या गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. या गैरव्यवहाराची अत्यंत गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले असून, ओशिवरा व्हिलेज एसआरए प्रकल्पातील दोन जबाबदार अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत.
उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित नागरी प्रश्न, रखडलेले पुनर्विकास प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या आढाव्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आमदार, खासदार तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
पात्र लाभार्थ्यांवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही
बैठकीदरम्यान खासदार रवींद्र वायकर यांनी भगतसिंग नगर १, २, ३, दुर्गानगर, मेघवाडी, कोयना वसाहत, सर्वोदय सोसायटी आणि ओशिवरा व्हिलेज या भागांतील एसआरए प्रकल्पांमधील अनियमिततांवर बोट ठेवले. पात्र झोपडीधारकांना डावलून बोगस लोकांना घरे वाटल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त केला.
या प्रकरणात कर्तव्यात कसूर करणाऱ्या एसआरएच्या संबंधित सक्षम प्राधिकारी आणि सहायक निबंधक अशा दोन अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. प्रशासनात पारदर्शकता आणि जबाबदारी राखण्यासाठी शासन कटिबद्ध असून, अशाच प्रकारे अलीकडेच कळवण उपजिल्हा रुग्णालयात निष्काळजीपणा करणाऱ्या ३ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
संक्रमण शिबिरांची (PTC) परस्पर विक्री; सखोल चौकशीचे आदेश
पुनर्विकास प्रकल्पादरम्यान विकासकाने बांधलेली कायमस्वरूपी संक्रमण शिबिराची (PTC) इमारत एसआरए प्राधिकरणाकडे हस्तांतरित करणे बंधनकारक असते. मात्र, विकासकाने या इमारती प्राधिकरणाला न देता त्यांची परस्पर विक्री केल्याची धक्कादायक बाब बैठकीत समोर आली. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मेट्रो स्थानकाला ‘हरे रामा हरे कृष्णा’ नाव देण्यास मंजुरी
या बैठकीत पायाभूत सुविधांसंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले:
- मेट्रो २ ब स्थानकाचे नामकरण: मेट्रो मार्गिका २ ब मधील पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या स्थानकाला ‘हरे रामा हरे कृष्णा’ असे नाव देण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या काळात संस्कृती जपणारे अनेक निर्णय घेतले जात असून, नुकतेच दहीहंडी उत्सवातून नशामुक्त महाराष्ट्र अभियानाला गती देण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते.
- जोगेश्वरी गुंफांचा विकास: ऐतिहासिक जोगेश्वरी गुंफांचा पर्यटन विभागामार्फत सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य सरकार आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही दिली.
- मेट्रो ६ प्रकल्पबाधितांना घरे: सर्वोदयनगर येथील मेट्रो ६ मुळे बाधित झालेल्या रहिवाशांना सदनिका वाटप करण्यात आले असून, प्रातिनिधिक स्वरूपात ६ लाभार्थ्यांना चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.
- आप्पा पाडा पायाभूत सुविधा: आरे कॉलनीतील आप्पा पाडा परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी पालिका, वनविभाग आणि आदिवासी विकास विभागाने संयुक्त पाहणी करून त्वरित उपाययोजना कराव्यात, असे निर्देश दिले.
एसआरए प्रकल्पांमधील न्यायालयीन प्रकरणांचा निपटारा वेगाने व्हावा यासाठी निष्णात कायदेतज्ज्ञांची विशेष टीम तयार करण्याचे निर्देशही या वेळी देण्यात आले.