भारत आणि बेल्जियममधील हिरे व्यापार भागीदारी नव्या उंचीवर पोहोचणार; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचा विश्वास

मुंबई: भारत आणि बेल्जियम यांच्यातील शतकाहून अधिक जुनी हिरे व्यापारातील भागीदारी ही केवळ व्यावसायिक नसून ती परस्पर विश्वास, पारदर्शकता आणि अखंड सहकार्यावर आधारलेली आहे. हे नाते ग्रीक भाषेतील ‘ॲडमास’ (कधीही न तुटणारे) या शब्दाप्रमाणे अत्यंत भक्कम आहे, असा ठाम विश्वास बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर (Bart De Wever) यांनी व्यक्त केला आहे.

वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) भारत डायमंड बोर्स (BDB) येथे हिरे व्यापार क्षेत्रातील प्रमुख उद्योजकांसाठी आयोजित विशेष संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी महाराष्ट्राचे राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल, भारत डायमंड बोर्सचे अध्यक्ष अनुप मेहता, जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे (GJEPC) अध्यक्ष किरीट भन्साली यांच्यासह हिरे व्यापार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

भारत आणि अँटवर्प: हिरे व्यापाराचे जागतिक केंद्र

आपल्या मुंबई दौऱ्याचा विशेष उल्लेख करताना पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांनी अँटवर्प आणि मुंबई या दोन शहरांची तुलना जागतिक आर्थिक केंद्र म्हणून केली. ते म्हणाले, “भारत हा जगातील हिऱ्यांचा मूळ स्रोत असून देशाला हजारो वर्षांचा हिरे व्यापाराचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. आज जगात उत्पादित होणाऱ्या १० पैकी ९ पेक्षा जास्त हिऱ्यांवर भारतात पैलू पाडले जातात, तर बेल्जियममधील अँटवर्प हे जागतिक पातळीवर हिरे व्यापाराचे सर्वात महत्त्वाचे केंद्र आहे.”

त्यांनी भारताला ‘जगाची कार्यशाळा’ तर अँटवर्पला ‘जगाला जोडणारे व्यासपीठ’ अशी उपमा देत दोन्ही देशांची ताकद एकमेकांना पूरक असल्याचे स्पष्ट केले.

व्यापाराला गती देण्यासाठी मुंबईत नवे कार्यालय

दोन्ही देशांमधील हिरे व्यापार अधिक गतिमान आणि सुलभ करण्यासाठी ‘एचआरडी अँटवर्प’चे नवे कार्यालय मुंबईत सुरू केले जात असल्याची घोषणाही पंतप्रधान वेव्हर यांनी केली. याशिवाय भारतीय हिरे व्यावसायिकांना बेल्जियममध्ये ये-जा करण्यासाठी सुलभ व्हिसा सुविधा देण्यावर भर देण्यात आला आहे. दरम्यान, युरोपियन युनियन आणि भारत यांच्यातील संबंधांचा संदर्भ देताना भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारात महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे संकेत यापूर्वीच मिळाले आहेत, ज्याचा मोठा लाभ हिरे क्षेत्रालाही होणार आहे.

पंतप्रधान वेव्हर यांच्या या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान औद्योगिक विकासाला गती देणारे महत्त्वपूर्ण करारही झाले आहेत, ज्यामध्ये गडचिरोलीत देशातील पहिला हरित पोलाद प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

भारतीय उद्योजकांचे अँटवर्पमधील ऐतिहासिक योगदान

सुमारे १०० वर्षांपूर्वी भारतीय व्यापाऱ्यांनी अँटवर्पमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत स्वतःचे स्थान निर्माण केले होते. प्रामाणिकपणा, अथक मेहनत आणि व्यावसायिक नीतिमत्तेच्या जोरावर आज अनेक भारतीय कुटुंबे अँटवर्पच्या हिरे उद्योगाचे नेतृत्व करत आहेत, अशा शब्दांत बेल्जियमच्या पंतप्रधानांनी भारतीय समुदायाचे कौतुक केले.

वार्षिक ३.५ अब्ज डॉलर्सचा व्यापार

जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष किरीट भन्साली यांनी सांगितले की, भारत डायमंड बोर्सला प्रत्यक्ष भेट देणारे बार्ट डी. वेव्हर हे भारताबाहेरील पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षात उभय देशांमधील रत्न आणि दागिन्यांचा व्यापार तब्बल ३.५ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या घरात पोहोचला असून, या क्षेत्रामुळे भारतात लाखो कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

भारत डायमंड बोर्स हे जगातील सर्वांत मोठे हिरे व्यापारी केंद्र असून, येथे सुमारे २,५०० कार्यालये कार्यरत आहेत व दररोज ४५ हजारांहून अधिक व्यावसायिक व्यवहार करतात, अशी माहिती बीकेसी बोर्सचे अध्यक्ष अनुप मेहता यांनी दिली.

Top Posts

मराठवाड्यातील क्रीडा संकुलांचा होणार कायापालट; आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांसाठी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचे निर्देश

अधिक वाचा

अवयवदानामुळे हजारो रुग्णांना नवजीवन; राज्यभरात व्यापक जनजागृती मोहीम राबवण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

अधिक वाचा

भारत आणि बेल्जियममधील हिरे व्यापार भागीदारी नव्या उंचीवर पोहोचणार; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचा विश्वास

अधिक वाचा

सातारा जिल्ह्याच्या सहकार आणि कृषी विकासात क्रांतिवीर किसन वीर यांचे योगदान अद्वितीय: पालकमंत्री शंभूराज देसाई

अधिक वाचा

एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना ‘बार्टी’ देणार ₹१०,००० चे सहाय्य; असा करा अर्ज!

अधिक वाचा