कोल्हापूर: राज्यातील आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील उद्योग विश्वात मोठी क्षमता आहे. स्थानिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनी (MSME) केवळ देशांतर्गत मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले स्थान भक्कम केले पाहिजे. ज्या उद्योगांनी अद्याप निर्यात सुरू केलेली नाही, त्यांनी नव्या जागतिक संधींचा शोध घ्यावा, असे महत्त्वपूर्ण आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले आहे.
कोल्हापूर येथील हॉटेल सयाजीमध्ये ‘फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन’ (FIEO) आणि ‘महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ’ (MSSIDC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या आंतरराष्ट्रीय रिव्हर्स बायर-सेलर मिटच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कोल्हापूर दौऱ्यादरम्यान उद्योग परिषदेला संबोधित करण्यापूर्वी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी घेतले करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन आणि शहराच्या विकासात्मक वाटचालीचे कौतुक केले.
कृषी क्षेत्रानंतर एमएसएमई सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आपल्या भाषणात सांगितले की, देशात सध्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची संख्या तब्बल ९.६१ कोटींवर पोहोचली आहे. भारताच्या एकूण निर्यातीमध्ये या क्षेत्राचा वाटा सुमारे ४८.५८ टक्के इतका मोठा आहे. कृषी क्षेत्रानंतर देशात सर्वाधिक रोजगार (सुमारे ४२ कोटी नागरिकांना) देण्याची ताकद याच उद्योगांमध्ये आहे. त्यामुळे एमएसएमई उद्योगांनी जागतिक दर्जाची गुणवत्ता राखून स्पर्धात्मक बाजारपेठेत उतरायला हवे.
आर्थिक आकडेवारी स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्राची एकूण वस्तू निर्यात ६९.९ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती. विशेष म्हणजे यात एकट्या कोल्हापूर जिल्ह्याचा वाटा ७२२ दशलक्ष अमेरिकन डॉलर राहिला आहे, जे अत्यंत अभिमानास्पद आहे.
‘रॅम्प’ (RAMP) योजनेमुळे उद्योगांना नवसंजीवनी
या कार्यक्रमात महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या (MSSIDC) व्यवस्थापकीय संचालक श्रीमती प्रेरणा देशभ्रतार यांनी केंद्र सरकारच्या RAMP (Raising and Accelerating MSME Performance) योजनेची माहिती दिली. जागतिक बँकेच्या सहकार्याने राबवली जाणारी ही योजना उद्योगांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, बाजारातील पोहोच विस्तारण्यासाठी आणि संस्थात्मक पाया मजबूत करण्यासाठी महत्त्वाची ठरत आहे.
त्याचबरोबर एफआयईओचे (FIEO) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय सहाय यांनी सांगितले की, देशाच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्र एकटा १६ टक्के वाटा उचलतो. उद्योजकांनी अशा आंतरराष्ट्रीय व्यापारी मेळाव्यांचा लाभ घेऊन आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी दीर्घकालीन व्यावसायिक भागीदारी प्रस्थापित करावी.
कृषी आणि प्रक्रिया उद्योगांना मोठी संधी
दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेमध्ये शेतमाल व कृषी प्रक्रिया उत्पादने, अभियांत्रिकी उत्पादने, कापड व वस्त्रोद्योग, चामड्याच्या वस्तू, हस्तकला तसेच कोल्हापूरची प्रसिद्ध चांदीची कलाकुसर यांसारख्या विविध उत्पादनांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. शेतीपूरक व्यवसाय व प्रक्रिया उद्योगांना निर्यात वाढीसाठी या मंचावरून मोठे सहकार्य लाभत आहे.
या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संपर्क मेळाव्यात २७ देशांतील ५२ हून अधिक परदेशी खरेदीदार (Buyers) आणि महाराष्ट्रातील ४५० हून अधिक स्थानिक एमएसएमई व निर्यातदार (Sellers) थेट संवाद साधत आहेत. या कार्यक्रमाला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे आणि FIEO चे प्रादेशिक अध्यक्ष खुशवंत जैन यांच्यासह अनेक मान्यवर व उद्योजक उपस्थित होते.