२६ ऑगस्ट १९८२ रोजी स्वतंत्र जिल्हा म्हणून उदयास आलेला गडचिरोली आज आपल्या विकासाच्या एका अत्यंत निर्णायक आणि ऐतिहासिक वळणावर उभा आहे. घनदाट अरण्ये, विपुल खनिजसंपदा आणि संपन्न आदिवासी संस्कृती लाभलेला हा भूभाग अनेक दशकांपासून ‘अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त’ म्हणून ओळखला जात होता. मात्र, आता हे चित्र वेगाने बदलत असून गडचिरोली शांतता, स्थैर्य, उद्योग, पायाभूत सुविधा आणि सर्वांगीण मानवी विकासाच्या बळावर महाराष्ट्राचे नवे आर्थिक आणि औद्योगिक केंद्र म्हणून नावारूपास येत आहे.
सुरक्षा आणि लोकविश्वास: विकासाची मजबूत पायाभरणी
जिल्ह्यातील नक्षलवादाचे सावट दूर करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांचे प्रभावी कार्य, आत्मसमर्पण धोरण आणि गतिमान पुनर्वसन योजना अत्यंत उपयुक्त ठरल्या आहेत. पारंपरिक सुरक्षेच्या पलीकडे जाऊन गडचिरोली पोलीस दलाने ‘पोलीस दादालोरा खिडकी’ या अभिनव उपक्रमाद्वारे दुर्गम भागातील आदिवासी बांधव आणि शासन यांच्यात विश्वासाचा नवा सेतू उभारला आहे. या माध्यमातून नागरिकांपर्यंत जात प्रमाणपत्रे, रेशन कार्ड, आरोग्य सुविधा आणि स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण पोहोचवले जात आहे.
भयाच्या छायेतून बाहेर पडत लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढला असून, नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमधील विक्रमी मतदान हे गडचिरोलीतील वाढत्या लोकविश्वासाचे जिवंत उदाहरण आहे.
दळणवळणात क्रांती: दुर्गमतेकडून महामार्गांकडे वाटचाल
एकेकाळी पावसाळ्यात जगाशी संपर्क तुटणाऱ्या या जिल्ह्यात आता बारमाही पक्के रस्ते आणि मोठे पूल उभे राहत आहेत. इंद्रावती, बांडिया, पर्लकोटा, गुंडेनूर आणि दिना नद्यांवरील पुलांमुळे दुर्गम गावांचे अंतर कमी झाले आहे.
- रेल्वे जोडणी: ५२.६८ किलोमीटर लांबीच्या वडसा-गडचिरोली ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पामुळे गडचिरोली थेट देशाच्या रेल्वे नकाशावर जोडले जात आहे.
- समृद्धी महामार्ग जोडणी: सुमारे ९४ किमी लांबीचा भंडारा-गडचिरोली महामार्ग आणि सुरजागड-कोनसरी औद्योगिक कॉरिडॉरमुळे खनिज वाहतुकीला प्रचंड गती मिळत आहे.
- डिजिटल क्रांती: ५०० हून अधिक नवीन मोबाईल टॉवर्स आणि भारतनेटच्या माध्यमातून दुर्गम गावांमध्ये टेलिमेडिसिन, डिजिटल बँकिंग आणि ई-प्रशासनाची सुविधा पोहोचली आहे.
उदयोन्मुख स्टील हब आणि औद्योगिक भरभराट
सुरजागड येथील उच्च दर्जाच्या लोहखनिजामुळे गडचिरोली देशातील एक आघाडीचे एकात्मिक पोलाद उत्पादन केंद्र (Integrated Steel Hub) म्हणून उदयास येत आहे. पोलाद आणि खनिज प्रक्रिया क्षेत्रात तब्बल ३ लाख कोटी रुपयांपर्यंतच्या संभाव्य गुंतवणुकीची नवी कवाडे खुली झाली आहेत. या उद्योगांमुळे केवळ खाणकाम न होता स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन, पूरक लघुउद्योग, वाहतूक, लॉजिस्टिक्स आणि तंत्रकुशल रोजगारांची निर्मिती होत आहे.
तसेच, जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या (DMFT) १ हजार कोटींहून अधिक निधीतून ६५ टक्क्यांपेक्षा जास्त खर्च स्थानिक रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य आणि शिक्षण यावर केला जात आहे, ज्यामुळे खनिजांचा प्रत्यक्ष लाभ स्थानिक जनतेला मिळत आहे.
मानवी विकास, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील प्रगती
गडचिरोलीमध्ये १०० विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि अहेरी येथे १०० खाटांचे स्त्री व नवजात अर्भक रुग्णालय सुरू झाल्याने आरोग्य व्यवस्थेत मोठा बदल झाला आहे. गर्भवती महिलांसाठी ‘माहेर घर’ आणि फिरती आरोग्य पथके वरदान ठरत आहेत.
शैक्षणिक क्षेत्रात गोंडवाना विद्यापीठाने जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय सहकार्य करार केले आहेत. आदिवासी आणि ग्रामीण भागातील तरुणांच्या भविष्यासाठी राज्य शासन विविध पावले उचलत असून आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत विविध शैक्षणिक व भरती प्रक्रिया वेगाने राबवल्या जात आहेत.
जलसुरक्षा आणि ग्रामीण सक्षमीकरण
शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी जलयुक्त शिवार २.० आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून ६ हजारांहून अधिक जलसंधारणाची कामे पूर्ण झाली आहेत. ‘हर घर जल’ अभियानांतर्गत शेकडो गावांमध्ये शुद्ध नळजोडणी उपलब्ध झाली आहे. राज्य सरकार ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचे नियोजन करताना शेतकऱ्यांचे नुकसान टाळून शाश्वत विकासाचा मार्ग अवलंबत आहे.
नैसर्गिक संपदा आणि शाश्वत पर्यटन
गडचिरोली केवळ खनिजांवर अवलंबून नसून येथील विशाल वनसंपदा, आलापल्लीचे जागतिक कीर्तीचे सागवान, कमलापूर हत्ती कॅम्प, बिनागुंडा धबधबा आणि ऐतिहासिक मार्कंडा देवस्थान हे पर्यटनाचे नवे केंद्र बनत आहेत. अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिर आणि देशाच्या नवीन संसद भवनासाठी गडचिरोलीच्या आलापल्ली सागवानाचा वापर करण्यात आला, ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे.
निष्कर्ष: संघर्षाकडून समृद्धीकडे
‘जल, जंगल आणि जमीन’ यांचे संवर्धन करत, आदिवासी संस्कृतीचा आदर राखून गडचिरोली जिल्ह्याने घडवलेला हा कायापालट संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक आहे. एकेकाळी दहशतीच्या सावटाखाली असलेला गडचिरोली आज शांतता, उद्योग आणि सर्वसमावेशक समृद्धीच्या नव्या क्षितिजांकडे आत्मविश्वासाने झेपावत आहे.