यवतमाळ: संकटात सापडलेल्या बळीराजाला सावरण्यासाठी राज्य शासन पूर्ण ताकदीने पाठीशी उभे असून, शेतकऱ्यांच्या मदतीमध्ये कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ठाम ग्वाही राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील नरसापूर येथे त्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन दुष्काळग्रस्त शेतपिकांची पाहणी केली आणि स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला.
या पाहणी दौऱ्यादरम्यान महसूल मंत्र्यांनी पीक परिस्थिती, भूजल पातळी, वीज पुरवठा आणि सिंचनाच्या उपलब्धतेचा सविस्तर आढावा घेतला. तसेच प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता पीक पाहणी व नुकसान भरपाईचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करावेत, असे सक्त निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश
राज्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर असून शासनाने आधीच राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या दुष्काळी पार्श्वभूमीवर प्रशासन गतिमान पद्धतीने काम करत असून, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक आणि प्रशासकीय साहाय्य मिळवून देणे हीच सरकारची प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विशेषतः विदर्भातील दुष्काळी स्थिती लक्षात घेता, यापूर्वीच पूर्व विदर्भातील ३९ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर यवतमाळसह संपूर्ण बाधित भागातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा दिला जाईल, असा विश्वास मंत्र्यांनी व्यक्त केला.
‘डीसीएस ॲप’वरील पीक पेऱ्याची अडचण ‘ऑन द स्पॉट’ मार्गी
या दौऱ्यात शेतकऱ्यांनी एक अत्यंत महत्त्वाची तांत्रिक अडचण महसूल मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. डिजिटल क्रॉप सर्व्हे (DCS App) वर शेतकऱ्यांनी ई-पीक पेरा नोंदवूनही तो सॉफ्टवेअर किंवा संबंधित संकेतस्थळावर वेळेत प्रदर्शित होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली.
या तक्रारीची तत्काळ दखल घेत मंत्री बावनकुळे यांनी दौऱ्यादरम्यानच अतिरिक्त मुख्य सचिव, कृषी आयुक्त आणि जमाबंदी आयुक्त यांच्याशी कॉन्फरन्स कॉलद्वारे थेट संपर्क साधला. ही तांत्रिक त्रुटी तात्काळ दूर करून सर्व शेतकऱ्यांची नोंदणी सुरळीत करण्याचे निर्देश त्यांनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना जागेवरच दिले.
अनेक मान्यवर व अधिकाऱ्यांची उपस्थिती
या पाहणी दौऱ्यादरम्यान आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, खासदार संजय देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल खत्री, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, ॲड. प्रफुल्ल चव्हाण, नितीन भुतडा, प्रिया तोडसाम, आरती फुफाटे, देवानंद पवार, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार अभय देशपांडे, गटविकास अधिकारी अजय चव्हाण, तालुका कृषी अधिकारी सुहास बेंडे यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी आणि स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.