महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा प्राण असलेला गणेशोत्सव हा केवळ एक धार्मिक सण नसून कला, संस्कृती, सामाजिक ऐक्य आणि पारंपरिक कौशल्यांचे भव्य प्रतीक आहे. या उत्सवाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जगभरात पोहोचवण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ‘Bappa.org’ या डिजिटल मंचाची निर्मिती करण्यात आली आहे. या पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील स्थानिक परंपरा, कारागिरांचे कौशल्य आणि मंडळांच्या अनोख्या संकल्पनांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर दस्तऐवजीकरण (Documentation) केले जात आहे.
विशेषतः सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात यंदाच्या गणेशोत्सवाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा अधिकृत दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. आता ‘बाप्पा डॉट ऑर्ग’च्या माध्यमातून या उत्सवाचा प्रत्येक पैलू डिजिटल स्वरूपात जतन केला जात आहे.
सार्वजनिक गणेश मंडळांनी असा घ्यावा सहभाग
गावोगावच्या व शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या पारंपरिक मांडणीची माहिती जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. यासाठी मंडळांनी खालील मुद्द्यांचे संकलन करून Bappa.org वर नोंदणी करणे आवश्यक आहे:
- मंडळाच्या देखाव्याची आणि मूर्ती स्थापनेची पारंपरिक वैशिष्ट्ये.
- स्थानिक मूर्तिकार, कारागीर आणि सजावट करणाऱ्या कलावंतांची माहिती.
- उत्सवाशी जोडलेले ऐतिहासिक संदर्भ, जुने छायाचित्रे व परंपरा.
- स्थानिक खाद्यसंस्कृती, पारंपरिक प्रसाद आणि लोककलांचे सादरीकरण.
या उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील स्थानिक कलाकारांच्या कलेला हक्काचे व्यासपीठ मिळेल आणि पुढील पिढ्यांसाठी हा अमूल्य सांस्कृतिक ठेवा कायमस्वरूपी सुरक्षित राहील.
‘घरोघरी बाप्पा’ उपक्रम: नागरिकांना मिळणार डिजिटल प्रमाणपत्र
सार्वजनिक मंडळांप्रमाणेच सर्वसामान्य कुटुंबांसाठी ‘घरोघरी बाप्पा’ ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या घरातील गणेशमूर्ती, पारंपरिक सजावट आणि उत्सवाशी संबंधित माहिती Bappa.org वर अपलोड करायची आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकाला शासनातर्फे अधिकृत ‘Digital Cultural Preserver Certificate’ प्रदान करण्यात येणार आहे.
यापूर्वीही ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड करून नागरिकांना प्रोत्साहन देण्यात आले होते. तसेच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गणेशोत्सवाचा आंतरराष्ट्रीय थाट पाहायला मिळाला होता, जिथे विविध देशांच्या राजदूतांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची प्रशंसा केली होती.
प्रचार-प्रसिद्धीसाठी व्यापक यंत्रणा कार्यरत
या मोहिमेची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, गृहनिर्माण सोसायट्या (RWAs), ग्रामपंचायती, महिला बचत गट आणि विविध सोशल मीडिया ग्रुप्सचा वापर केला जात आहे. प्रत्येक गावात व वॉर्डात क्यूआर कोड (QR Code) आणि पोस्टर्सच्या माध्यमातून थेट नोंदणी लिंक उपलब्ध करून दिली जात आहे.
आपल्या गावातील, घरातील अथवा मंडळातील गणेशोत्सवाची वैशिष्ट्यपूर्ण गाथा जगासमोर मांडण्यासाठी सर्व नागरिकांनी व सार्वजनिक मंडळांनी Bappa.org या संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.