मुंबई: आषाढी वारी २०२६ च्या निमित्ताने पंढरीच्या वाटेवर असलेल्या लाखो वारकरी भाविकांसाठी राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग पूर्ण ताकदीने मैदानात उतरला आहे. ‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची’ ही संकल्पना प्रत्यक्षात राबवत, आतापर्यंत तब्बल ३ लाख ८३ हजार ६४३ वारकऱ्यांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर तसेच आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ही व्यापक मोहीम राबवली जात आहे. वारीच्या काळात वारकऱ्यांची आरोग्य सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन किती तत्पर आहे, हे यावरून दिसून येते. दरम्यान, वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी प्रशासन सज्ज असून दिंडी प्रमुखांना प्रथमोपचार किटचे वाटप देखील करण्यात आले आहे.
आरोग्य सेवेची महत्त्वपूर्ण आकडेवारी (आतापर्यंतचे उपचार):
- एकूण उपचार घेतलेले वारकरी: ३,८३,६४३+
- बाह्यरुग्ण (OPD) सेवा: ३ लाख ८० हजार ४८५
- आंतररुग्ण (IPD) सेवा: ३ हजार १५८
- पुढील उपचारासाठी संदर्भित (Refer): ८८३ रुग्ण
पालखी मार्गावर ‘अशी’ आहे आरोग्य यंत्रणा:
लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण पालखी मार्गावर तज्ज्ञ डॉक्टर्स आणि आधुनिक वैद्यकीय सुविधांची मोठी फौज तैनात करण्यात आली आहे:
- रुग्णवाहिका: ३५३ सुसज्ज रुग्णवाहिका २४ तास सेवेत आहेत.
- आयसीयू (ICU): ४३ अत्याधुनिक आयसीयू कक्ष.
- आपला दवाखाना: १५६ ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ कार्यरत.
- आरोग्यदूत आणि वैद्यकीय कर्मचारी: २१५ आरोग्यदूत, ३,०८७ वैद्यकीय अधिकारी/कर्मचारी आणि ३०२ तज्ज्ञ डॉक्टर सेवा देत आहेत.
यंदाच्या वारीचे विशेष आकर्षण: एअर ॲम्बुलन्स!
पंढरपूरमध्ये २४ तास कार्यरत असणाऱ्या आयसीयू कक्षासोबतच ३ दिवसांचे भव्य महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय, गंभीर रुग्णांना तातडीने मोठ्या रुग्णालयात हलवण्यासाठी यंदा प्रथमच एअर ॲम्बुलन्स (Air Ambulance) सेवा सज्ज ठेवण्यात आली आहे, जे यंदाच्या वारीचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले आहे.
प्रशासकीय पातळीवर वारीच्या व्यवस्थेवर कडक लक्ष ठेवले जात आहे. नुकतेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी थेट बुलेटवरून दर्शन रांगेची पाहणी करत व्यवस्थेचा आढावा घेतला होता.
इतर प्रतिबंधात्मक व आरोग्याभिमुख उपाययोजना:
केवळ औषधोपचारच नव्हे, तर आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही भर दिला आहे:
- पाणी शुद्धीकरण: पालखी मार्गावरील सर्व पाणी स्रोतांचे नियमित सर्वेक्षण आणि निर्जंतुकीकरण केले जात आहे.
- कीटकजन्य आजार प्रतिबंध: डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी सुरू आहे.
- स्वच्छता मोहीम: पालखी मुक्कामाच्या ठिकाणी हॉटेल, ढाबे आणि अन्न पुरवठादारांच्या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. तसेच वारीनंतर विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.
- ‘आरोग्यसंपन्न वारी’ ॲप: वारकऱ्यांना डिजिटल पद्धतीने तातडीच्या आरोग्य सुविधांची माहिती मिळण्यासाठी खास मोबाईल ॲप्लिकेशन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
पंढरीची वारी आरोग्यसंपन्न आणि सुखकर व्हावी यासाठी राज्य शासनाची संपूर्ण आरोग्य यंत्रणा डोळ्यात तेल घालून काम करत आहे.