मुंबई: सध्याच्या धकाधकीच्या युगात बदलती जीवनशैली, मोबाईल स्क्रीनचा वाढता वेळ, अपुरी झोप, अयोग्य आहार आणि वाढता मानसिक ताण यामुळे तरुण पिढीच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन महाविद्यालयीन तरुणांमध्ये आरोग्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी राज्यभरात ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद, जागर आरोग्याचा’ हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. या अभिनव उपक्रमांतर्गत राज्यभरात आतापर्यंत ३९३ सत्रे पार पडली असून तब्बल ५२ हजार ३८६ विद्यार्थ्यांनी यात सक्रिय सहभाग घेतला आहे.
विद्यार्थ्यांना तरुण वयातच सुदृढ आरोग्याची सवय लागावी, आहाराचे योग्य नियोजन कळावे, व्यायामाचे महत्त्व समजावे आणि मानसिक ताणतणाव व्यवस्थापनाचे धडे मिळावेत, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी मोहिमांप्रमाणेच तरुणांच्या सक्षमीकरणासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरत आहे. जसे शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता आणि स्वच्छता राखण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबवली जात आहे, त्याच धर्तीवर महाविद्यालयांमध्ये तरुणांच्या आरोग्यासाठी हा जागर सुरू आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांकडून थेट मार्गदर्शन
या उपक्रमांतर्गत नामांकित वैद्यकीय महाविद्यालये आणि विद्यापीठांतील प्राध्यापक तसेच अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञ विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत आहेत. या सत्रांमध्ये कृषी, वैद्यकीय, अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य आणि कला या सर्वच शाखांतील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. यामध्ये संतुलित आहाराचे महत्त्व, नियमित व्यायामाची गरज, सोशल मीडिया आणि मोबाईलचा नियंत्रित वापर, व्यसनमुक्ती आणि मानसिक आरोग्य यांसारख्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली जात आहे.
विभागनिहाय विद्यार्थ्यांचा सहभाग:
राज्यातील विविध विभागांतून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे:
- पश्चिम महाराष्ट्र: १२२ सत्रांमधून सर्वाधिक ११ हजार ९८० विद्यार्थी सहभागी.
- नाशिक विभाग: ९३ सत्रांत १० हजार ६३४ विद्यार्थ्यांची उपस्थिती.
- मराठवाडा विभाग: ९१ सत्रांमध्ये ९ हजार ८५४ विद्यार्थी सहभागी.
- कोकण विभाग: ५३ सत्रांत ६ हजार ४०४ विद्यार्थी.
- अमरावती विभाग: ६२ सत्रांमध्ये ६ हजार ३५२ विद्यार्थ्यांचा सहभाग.
- नागपूर विभाग: ४५ सत्रांतून ३ हजार ८९३ विद्यार्थी.
- मुंबई विभाग: २४ सत्रांमध्ये ३ हजार २६९ विद्यार्थ्यांचा सहभाग.
शासकीय यंत्रणा ज्याप्रमाणे लोकाभिमुख सेवा देण्यासाठी सेवा संकल्प अभियान राबवून संवेदनशीलतेने काम करत आहे, त्याच संवेदनशील भावनेतून विद्यार्थ्यांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सक्रिय झाली आहे.
आरोग्यसंपन्न पिढी घडवण्याचा संकल्प
तज्ज्ञांशी थेट संवाद साधता आल्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनशैलीतील अडचणी आणि आरोग्यविषयक शंकांचे मोकळेपणाने निरसन करून घेतले. या सत्रांमधून मिळालेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी केवळ स्वतःपुरते मर्यादित न ठेवता कुटुंब आणि मित्रांपर्यंत पोहोचवावे, असा प्रयत्न आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्रात आरोग्याबाबत सजग आणि जागरूक तरुण पिढी निर्माण होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी व्यक्त केला आहे.