ठाणे: वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत असून ‘ग्लोबल वॉर्मिंग’चे संकट उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने त्याचे गंभीर दुष्परिणाम निसर्गावर आणि मानवी आरोग्यावर होत आहेत. हे संकट टाळण्यासाठी प्लास्टिक व्यवस्थापन आणि पुनर्प्रक्रिया अत्यंत आवश्यक असून यासाठी नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग गरजेचा आहे, असे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
ठाण्यातील हॉटेल विवांत येथे महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB), ठाणे महानगरपालिका आणि हिंदुस्थान कोका-कोला बेव्हरेजेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महा आर-पेट बॉटल व स्टिकर्स अनावरण’ सोहळ्यात त्या बोलत होत्या. या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत शासनाचा एकही रुपया खर्च न करता स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (CSR) माध्यमातून राज्यातील १३ महत्त्वाच्या शहरांमध्ये प्लास्टिक पुनर्प्रक्रियेचे काम केले जाणार आहे. अशा प्रकारचा अभिनव प्रकल्प राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
ज्याप्रमाणे प्रशासकीय पातळीवर मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सेवा संकल्प अभियान’ राबवून स्वच्छता आणि कार्यक्षमता वाढवली जात आहे, त्याच धर्तीवर पर्यावरण रक्षणासाठी सार्वजनिक चळवळ उभी राहणे आवश्यक असल्याचे पर्यावरणमंत्र्यांनी अधोरेखित केले.
‘एक बॉटल पर्यावरण के नाम’ अभियानात सहभागी व्हा
पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले की, केवळ सोशल मीडिया, फोटो किंवा व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती करून पर्यावरण सुधारणार नाही. “फक्त आरसा पुसून चालणार नाही, तर चेहऱ्यावरील डागही पुसला पाहिजे. हक्क आणि कर्तव्ये या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे नागरिकांनी ‘एक बॉटल पर्यावरण के नाम’ हा संकल्प करून प्लास्टिकचा पुनर्वापर वाढवण्यासाठी पुढे यावे,” असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.
पर्यावरण संतुलनासोबतच ग्रामीण भागात जलसंधारण आणि पाणीटंचाई निवारणाची कामे वेगाने होणे आणि शहरांमध्ये कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने होणे, हे शाश्वत विकासासाठी अत्यंत पूरक ठरणार आहे.
लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य
कार्यक्रमादरम्यान आमदार माधवी नाईक यांनी ठाण्यातून सुरू होणाऱ्या या पहिल्या प्रकल्पाचे स्वागत करत लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिक म्हणून या मोहिमेस संपूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही दिली. आमदार निरंजन डावखरे यांनी प्रदूषण नियंत्रणासाठी कॉर्पोरेट कंपन्यांनी पुढाकार घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि ही मोहीम राज्यभर प्रभावीपणे राबवण्याचा विश्वास व्यक्त केला. ठाण्याचे अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने या अभियानाला सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल असे सांगितले.
२०४७ पर्यंत कार्बन न्यूट्रॅलिटीचे ध्येय
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार यांनी सांगितले की, फेब्रुवारी २०२६ पासून या उपक्रमाचे नियोजन सुरू होते. केंद्र सरकारच्या ‘लाईफ’ (LiFE – Lifestyle for Environment) या संकल्पनेनुसार आणि २०४७ पर्यंत कार्बन न्यूट्रॅलिटी साध्य करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलले गेले आहे. प्लास्टिकचा कचरा कमी करून त्याचे वैज्ञानिक पद्धतीने रिसायकलिंग करणे हेच या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या कार्यक्रमास कोका कोलाचे क्लस्टर हेड के.के. जोसेफ, चीफ पब्लिक अफेअर्स हिमांशू प्रियदर्शी यांच्यासह सिने अभिनेते प्रसाद ओक, डिनो जोसेफ, शिवानी सुर्वे, अमित रेयॉन आणि अनेक पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते.