कोल्हापूर: निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा, समृद्ध क्रीडा संस्कृती आणि औद्योगिक भरभराट लाभलेल्या कोल्हापूर जिल्ह्याचे सर्वांगीण आणि एकात्मिक ब्रँडिंग होणे काळाची गरज आहे. कोल्हापूरला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देण्यासाठी ‘कोल्हापूर महोत्सवा’सारखे भव्य उपक्रम प्रशासनाने प्रभावीपणे राबवावेत, असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले आहे.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. या उच्चस्तरीय बैठकीला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन, इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्यासह प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूरची समृद्ध परंपरा आणि जागतिक ब्रँडिंग
बैठकीत बोलताना राज्यपाल म्हणाले की, कोल्हापूरला अत्यंत गौरवशाली परंपरा लाभलेली आहे. येथील कुस्ती आणि कबड्डीची परंपरा देशभर नावाजलेली आहे. तसेच इचलकरंजीचे वस्त्रोद्योग आणि हुपरीचा चांदी उद्योग जगभरात पोहोचलेला आहे. श्री अंबाबाई आणि श्री जोतिबा देवस्थानमुळे जिल्ह्याला मोठी तीर्थक्षेत्रीय ओळख लाभली आहे. याशिवाय कोल्हापुरी गूळ, कोल्हापुरी चप्पल आणि वैशिष्ट्यपूर्ण हस्तकला यांना मोठी मागणी आहे.
यापूर्वी कोल्हापुरात आयोजित कार्यक्रमात बोलताना लघु व मध्यम उद्योगांनी जागतिक बाजारपेठ काबीज करावी, असे आवाहनही राज्यपालांनी केले होते. आता कोल्हापूरच्या या कृषी आणि औद्योगिक क्षमतेला अधिक चालना देण्यासाठी विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि सातत्यपूर्ण महोत्सव भरवणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
नशामुक्त आणि टीबीमुक्त समाजासाठी लोकचळवळीची गरज
सुदृढ आणि सशक्त पिढी घडवण्यासाठी ‘नशा मुक्त भारत’ आणि ‘टीबी मुक्त भारत’ या अभियानांची अंमलबजावणी युद्धपातळीवर झाली पाहिजे, असे सांगून राज्यपाल म्हणाले, “व्यसनमुक्ती केवळ कायदे किंवा पोलीस कारवाईपुरती मर्यादित न राहता, ती लोकचळवळ बनली पाहिजे. कुटुंबासह समाजातील खेळाडू, कलाकार आणि प्रभावी व्यक्तींनी या प्रबोधनात सक्रिय सहभाग घ्यावा.”
जिल्ह्यातील पायाभूत विकास प्रकल्पांचा आढावा
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी प्रमुख विकासकामांची माहिती दिली. यामध्ये महामार्ग विकास, कोल्हापूर विमानतळ विस्तार, प्रस्तावित आयटी पार्क, शक्तिपीठ महामार्ग, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्ग यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश होता.
या दौऱ्यात राज्यपालांनी तीर्थक्षेत्र विकासाचाही आढावा घेतला. विशेष म्हणजे, याआधी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी घेतलेले श्री अंबाबाईचे दर्शन व मंदिर संवर्धन कामांची पाहणी चर्चेत राहिली होती. बैठकीत श्री अंबाबाई व जोतिबा विकास आराखड्याची प्रगती तपासण्यात आली.
महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी, खासबाग मैदान, रंकाळा तलाव सुशोभीकरण, ॲस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियम आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांचे सादरीकरण केले. जिल्हा परिषदेच्या वतीने डॉ. जास्मिन यांनी समृद्ध शाळा व ‘पिंक रूम’ उपक्रमाची माहिती दिली. राज्यपालांनी जिल्हा परिषदेच्या पिंक रूम संकल्पनेचे आणि आपत्ती व्यवस्थापनात ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या रेस्क्यू टीमच्या अनोख्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.