मुंबई: महिला आणि बालकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची माहिती प्रत्यक्ष गरजू महिला व बालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘लोकसंवाद २०२६’ या विशेष जनजागृती मोहिमेंतर्गत विविध शासकीय विभागांच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविली जात आहे. अखिल खोताची वाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित लोकसंवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
या प्रसंगी बोलताना मंत्री तटकरे यांनी सांगितले की, राज्यभरात ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमाद्वारे शासकीय योजना नागरिकांपर्यंत नेऊन सक्षमीकरणाचा जागर सुरू आहे. या माध्यमातून महिला व बालकल्याण, कौशल्य विकास, रोजगार तसेच सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी उपक्रमांची माहिती सामान्य जनतेला दिली जात आहे.
महिला आणि बालकांसाठी महत्त्वपूर्ण योजना
मुलींच्या शिक्षणाला गती मिळावी आणि लिंग गुणोत्तरात सुधारणा व्हावी यासाठी राज्य शासनाने ‘लेक लाडकी’ योजना सुरू केली आहे. याशिवाय सध्या सुरू असलेल्या ‘पोषण माह’च्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील पालकांमध्ये पोषण आणि आरोग्याविषयी जनजागृती केली जात आहे. अनाथ मुलांसाठी बालकाश्रम, नोकरदार महिलांसाठी सुरक्षित शासकीय वसतिगृहे, तसेच उच्च शिक्षणासाठी मुंबईत येणाऱ्या गुणवंत तरुणींसाठी वसतिगृहांची उत्तम सोय उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
ज्याप्रमाणे शहरात ‘लोकसंवाद’ अभियानाला गणेशोत्सव मंडळांमध्ये प्रतिसाद मिळत आहे, त्याच धर्तीवर राज्यभरात राबविले जाणारे सेवा संकल्प अभियान देखील सर्वसामान्यांना शासकीय सेवा व दाखले घरपोच मिळवून देण्यात अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
विविध विभागांच्या समन्वयातून महिला सक्षमीकरण
महिला आणि बालकांच्या प्रगतीसाठी शासन सर्व विभागांना एकत्रित आणून काम करत आहे:
- आरोग्य विभाग: माता व बाल आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय सुविधा पुरवणे.
- उद्योग विभाग व माविम (MAVIM): ग्रामीण व शहरी भागातील महिलांना बचत गट आणि लघुउद्योगांसाठी आर्थिक पाठबळ देणे.
- कृषी विभाग: शेतकरी महिलांना आधुनिक अवजारे, अनुदान आणि कृषी योजनांचा लाभ मिळवून देणे.
- गृह विभाग व महिला आयोग: महिला सुरक्षेसाठी कायदेशीर मदत व त्वरित संरक्षण पुरवणे.
या कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष संतोष मोगरे, सचिव सतीश फटकरे, खजिनदार सुशांत कवळे, उपाध्यक्ष विजय फटकरे तसेच विभागीय संपर्क अधिकारी संध्या गरवारे, श्रद्धा मेश्राम, अश्विनी पुजारी यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.