लखनौमध्ये घुमणार महाराष्ट्राचा सांस्कृतिक गजर; ‘नमन आणि दिंडी नृत्या’तून वारकरी परंपरेचा भव्य आविष्कार!

मुंबई: उत्तर प्रदेशची ऐतिहासिक राजधानी असलेल्या लखनौच्या भूमीत आता महाराष्ट्राची समृद्ध आणि विलोभनीय सांस्कृतिक परंपरा उलगडणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने लखनौ येथे एका विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्राची भक्तीपरंपरा, लोककला, लोकसंस्कृती, सण-उत्सव आणि ऐतिहासिक वैभवाचा कलात्मक आविष्कार ‘नमन व दिंडी नृत्य’ या सादरीकरणातून देशासमोर मांडला जाणार आहे.

‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ अंतर्गत सांस्कृतिक आदान-प्रदान

महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा देशाच्या विविध राज्यांमध्ये परिचय करून देण्याच्या उद्देशाने राज्यातील गुणवंत कलाकारांचे विशेष पथक लखनौमध्ये दाखल झाले आहे. हे सादरीकरण सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील कला आणि संस्कृतीचा गौरव राष्ट्रीय पातळीवर नेहमीच अधोरेखित होत आला आहे. नुकताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील १० दिग्गज कलावंतांचा राष्ट्रीय गौरव झाला असून, आता लोककलेचा हा वारसा थेट उत्तर प्रदेशच्या रसिकांपर्यंत पोहोचत आहे.

‘नमन’ व ‘दिंडी नृत्या’तून भक्तिरसाची अनुभूती

या विशेष सादरीकरणाची सुरुवात विघ्नहर्त्या गणरायाची आराधना करणाऱ्या पारंपरिक ‘नमन’ या कलाप्रकाराने होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या शतकानुशतके चालत आलेल्या वारकरी संप्रदायाची भक्तीपरंपरा आणि लोकजीवनाचे दर्शन घडवणारे चैतन्यमय ‘दिंडी नृत्य’ सादर केले जाईल. भक्तिभाव, पारंपरिक नृत्यशैली, लयबद्ध लोकसंगीत आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक ऊर्जा यांचा सुरेख संगम या सादरीकरणातून उपस्थितांना अनुभवायला मिळणार आहे.

महाराष्ट्रातील कलाकारांचे २३ सदस्यीय पथक

या सांस्कृतिक सादरीकरणाचे नेतृत्व टीम लीडर व नृत्यदिग्दर्शक ओंकार भास्कर रोकडे करत आहेत. या पथकात कनक दावरी, प्राची कांबळे, स्वालिया विजापुरे, सोनाली सुतार, रिद्धी मेहर, आर्या कदम, पूनम मगदूम, वैष्णवी वरक, ऋतुजा पाटील, बियांका पाटील यांच्यासह बबन शिंदे, प्रज्योत पाटील, आशुतोष चव्हाण, विकास कांबळे, ऋषिकेश चौधरी, सौरभ रोकडे, कहान दावरी, अरहम शेख, अजय काटे, पवन जोशी आणि बाहुबली राजमाने या कलाकारांचा सहभाग आहे.

ज्याप्रमाणे राष्ट्रीय उत्सवांच्या वेळी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात भव्य तिरंगा रॅली आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून राज्याची ओळख ठळक केली जाते, त्याचप्रमाणे लखनौमधील हा चार दिवसांचा मुक्काम विविधतेतून एकता आणि सांस्कृतिक बंधुभावाचा संदेश अधिक दृढ करणार आहे.

Top Posts

पारशी नववर्ष ‘नवरोझ’निमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्याकडून नागरिकांना आणि पारशी बांधवांना मंगलमय शुभेच्छा!

अधिक वाचा

स्वातंत्र्यदिनी आरोग्यमंत्र्यांचा गावागावांतील आरोग्य समित्यांशी थेट ऑनलाइन संवाद; राज्यातील १२४ नवीन आरोग्य संस्थांचे लोकार्पण!

अधिक वाचा

लखनौमध्ये घुमणार महाराष्ट्राचा सांस्कृतिक गजर; ‘नमन आणि दिंडी नृत्या’तून वारकरी परंपरेचा भव्य आविष्कार!

अधिक वाचा

महाराष्ट्रातील ३ लाख तरुणींना खासगी क्षेत्रात मिळणार हक्काचा रोजगार; राज्य सरकार व आयपीई ग्लोबलमध्ये महत्त्वाचा सामंजस्य करार

अधिक वाचा

महाराष्ट्रातील ITI विद्यार्थ्यांना ‘उन्नती’ संस्थेमार्फत मिळणार रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण; २० हजार तरुणांना घडवण्याचे उद्दिष्ट!

अधिक वाचा