पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६: बळीराजाला नवे जीवन देणारी ‘महासंजीवनी’!

महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तींचा मोठा फटका बसला आहे. कधी अवेळी पडणारा पाऊस, दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे राज्यातील बळीराजा कर्जबाजारीपणाच्या गर्तेत अडकला आहे. या संकटग्रस्त शेतकरी बांधवांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि पुन्हा नव्या उमेदीने शेती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. राज्य शासनाने सुरू केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ राज्यातील बळीराजाला सन्मानाने जगण्याची संधी देणारी एक नवी ‘संजीवनी’ ठरत आहे.

योजनेचे स्वरूप आणि लाभ (त्रिसूत्री)

या कर्जमुक्ती योजनेचे स्वरूप केवळ कर्जमाफीपुरते मर्यादित नसून, सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांचा विचार करून याची अत्यंत अभ्यासपूर्ण आखणी करण्यात आली आहे. या योजनेचे मुख्य तीन टप्पे खालीलप्रमाणे आहेत:

  • २ लाख रुपयांपर्यंत संपूर्ण कर्जमुक्ती: थकबाकीदार असणाऱ्या पात्र शेतकरी बांधवांना २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा थेट लाभ दिला जात आहे. यापूर्वीच्या कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठीही शासनाने यात विशेष तरतूद केली आहे.
  • एकवेळ समझोता योजना (One Time Settlement – OTS): ज्या शेतकऱ्यांची कर्ज थकबाकी २ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी वन टाईम सेटलमेंट (OTS) लागू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्शाची रक्कम भरल्यानंतर, शासन उर्वरित कर्जमुक्तीची रक्कम थेट त्यांच्या कर्ज खात्यात जमा करेल.
  • नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन: अत्यंत बिकट परिस्थितीतही जे शेतकरी बँकेच्या कर्जाची नियमित परतफेड करतात, अशा प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी शासनाने ५०,००० रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

डिजिटल तंत्रज्ञान आणि संपूर्ण पारदर्शकता

योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणतीही दिरंगाई किंवा तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून राज्य शासनाने ‘महाआयटी’च्या मदतीने संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि आधार क्रमांकावर आधारित ठेवली आहे. बँकांकडून पात्र कर्जखात्यांचा तपशील थेट पोर्टलवर घेऊन संगणकीय पडताळणीद्वारे अंतिम याद्या तयार केल्या जात आहेत. या याद्या शेतकऱ्यांना सहज पाहता याव्यात यासाठी गाव चावडी, ग्रामपंचायत आणि बँक शाखांमध्ये प्रसिद्ध केल्या जातील.

आधार प्रमाणीकरण करणे का अत्यंत आवश्यक आहे?

या योजनेचा थेट लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) करणे बंधनकारक आहे. यादीत नाव आल्यानंतर लाभार्थ्यांनी आपल्या आधार नंबरसह जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा बँकेत जाऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण करावे. जर ही प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली नाही, तर कर्जमुक्तीचे पैसे मिळण्यात तांत्रिक अडचण येऊ शकते. अधिक माहितीसाठी आपण शेतकरी कर्जमुक्ती योजना: तात्काळ करा ‘हे’ काम हा लेख वाचू शकता.

तक्रार निवारण आणि उत्तम समन्वय

शेतकऱ्यांच्या बँक खात्याच्या तपशिलात किंवा इतर माहितीमध्ये काही तांत्रिक चुका असल्यास दाद मागण्यासाठी सक्षम तक्रार निवारण यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. तसेच जिल्हा पातळीवर यासाठी विशेष समित्या नेमण्यात आल्या आहेत. सहकार विभाग, बँका आणि स्थानिक प्रशासनाच्या उत्तम समन्वयामुळे ही योजना अत्यंत गतिमान पद्धतीने राबवली जात आहे. ही योजना केवळ आर्थिक मदत नसून, बळीराजाला कर्जमुक्त करून कर्जमुक्तीकडून मनःशांतीकडे बळीराजाची नवी वाटचाल सुरू करून देणारी ठरत आहे.

थेट कर्जखात्यात पैसे जमा होण्याची तारीख

योजनेची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आली असून, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या थेट कर्जखात्यांमध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मिळणारा हा दिलासा लाखो शेतकरी कुटुंबांना नवीन पीक कर्ज मिळवण्यासाठी आणि पुन्हा नव्या जोमाने शेती करण्यासाठी मोठी मदत करेल यात शंका नाही.

Top Posts

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ‘अटल संस्मरण’ ग्रंथाचे प्रकाशन; राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे महत्त्वपूर्ण उद्गार

अधिक वाचा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६: बळीराजाला नवे जीवन देणारी ‘महासंजीवनी’!

अधिक वाचा

धुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ग्रंथालय प्रकल्पाला मिळणार गती! मंत्री संजय शिरसाट यांचे महत्त्वपूर्ण निर्देश

अधिक वाचा

महाबीजचे कृषी धोरण आणि खरीप नियोजन: MD दिलीप स्वामी यांची ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ वर विशेष मुलाखत!

अधिक वाचा

सिंहस्थ कुंभमेळा २०२६: त्र्यंबकेश्वरचा होणार संपूर्ण कायापालट! ६१ कोटींच्या भव्य प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन

अधिक वाचा