Kapas Kranti Online Application: महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. नवनिर्मिती केंद्र पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान म्हणजेच ‘कपास क्रांती’ (MCP) योजना राज्यात राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत कापूस पिकाच्या विविध आधुनिक तंत्रज्ञान प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या पीक प्रात्यक्षिकांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs) आणि कृषी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सहकारी संस्थांनी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानावर भर
यंदाच्या खरीप हंगामात संभाव्य एल निनो (El Nino) परिस्थितीचा अंदाज घेऊन, कपाशीची लागवड बेड पद्धतीने (गादीवाफा पद्धत) करणे आणि मूलस्थानी जलसंधारण (In-situ soil moisture conservation) उपाययोजना राबविण्यावर विशेष भर दिला जात आहे. या योजनेच्या माध्यमातून खालील तीन मुख्य तंत्रज्ञानांची प्रात्यक्षिके थेट शेतकऱ्यांच्या शेतावर घेतली जातील:
- क्लोजर स्पेसिंग (CS): या पद्धतीमध्ये कपाशीची लागवड ९० x ३० सेंमी अंतरावर केली जाते.
- सघन कापूस लागवड (HDPS): या पद्धतीत ९० x १५ सेंमी अंतरावर घनता पद्धतीने लागवड केली जाते, ज्यामुळे हेक्टरी झाडांची संख्या वाढून उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
- एकात्मिक पीक व्यवस्थापन (ICM): या पद्धतीअंतर्गत ९० x ६० सेंमी अंतरावर कपाशीची लागवड केली जाते.
शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसोबतच आपल्या पाळीव जनावरांची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. सध्या राज्यात पशुसंवर्धन विभागाकडून राज्यात मान्सूनपूर्व पशु लसीकरण मोहीम राबवली जात आहे, त्याचाही लाभ आवर्जून घ्यावा.
आंतरपीक पद्धतीमुळे वाढणार शेतकऱ्यांचे उत्पन्न
एकात्मिक पीक व्यवस्थापन (ICM) तंत्रज्ञानांतर्गत कपाशीसोबत मूग आणि उडीद यांसारख्या द्विदल आंतरपिकांचा समावेश करण्यात आला आहे. आंतरपीक पद्धतीचे अनेक फायदे आहेत:
- जमिनीमध्ये नत्राचे स्थिरीकरण होऊन जमिनीची सुपीकता वाढते.
- मुख्य पिकाव्यतिरिक्त शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा खात्रीशीर स्रोत मिळतो.
- हवामानातील बदलांमुळे होणारे नुकसान टाळण्यास आणि जोखीम कमी करण्यास मदत होते.
शेतकऱ्यांना मिळणार प्रत्यक्ष शेतावर मार्गदर्शन
क्लोजर स्पेसिंग आणि सघन कापूस लागवड तंत्रज्ञानामुळे प्रति हेक्टर झाडांची संख्या वाढून कापूस उत्पादनात मोठी वाढ शक्य होते. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या शेतकरी गटांना व संस्थांना संतुलित खत व्यवस्थापन, योग्य पाणी व्यवस्थापन, तसेच एकात्मिक कीड व रोग नियंत्रण (IPM) यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचे थेट शेतावर मार्गदर्शन केले जाणार आहे.
कृषी क्षेत्रातील विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना बोगस जाहिराती आणि फसवणुकीपासून सावध राहणे गरजेचे आहे. नुकतेच शासनाने ‘कृषी मित्र’ भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावधान राहण्याचा इशारा दिला आहे, याची सर्व सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.
अर्ज कुठे आणि कसा करावा?
इच्छुक आणि पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs) आणि सहकारी संस्थांनी महाडीबीटीच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा.
महत्त्वाची अट: ज्या शेतकरी गटांनी किंवा संस्थांनी मागील दोन वर्षांत या पीक प्रात्यक्षिक योजनेचा लाभ घेतला आहे, अशा गटांची यावर्षीच्या निवडीसाठी विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.