मुंबई: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी गावठी दारू पििल्यामुळे तब्बल १८ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली होती. या गंभीर प्रकरणाची दखल घेत अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात अवैध रसायन साठ्यांविरोधात व्यापक मोहीम हाती घेतली आहे. याच मोहिमेअंतर्गत भिवंडी येथील एका गोदामावर धडक कारवाई करत तब्बल ५,९२९ किलो मिथेनॉलचा (Methanol) साठा जप्त करण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील विषारी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले घातक मिथेनॉल याच भिवंडीच्या कंपनीकडून पुरवण्यात आले होते. या कारवाईमुळे अवैध दारू आणि रसायनांचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.
कशी उघड झाली पुणे विषारी दारू प्रकरणाची साखळी?
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर परिसरात विषारी गावठी दारू प्यायल्याने मृत्यूचे तांडव घडले होते. पोलीस तपासात खालील धक्कादायक साखळी समोर आली आहे:
- मृत व्यक्तींनी फुगेवाडी येथील कर्नालसिंग विरका याच्या अड्ड्यावरून हातभट्टीची दारू घेतली होती.
- विरका याला हा माल योगेश वानखेडे याने पुरवला होता.
- योगेश वानखेडे हा उरळी कांचन येथील राजू प्रजापती नावाच्या व्यक्तीकडून ही दारू घेत असे.
- या सर्व साखळीला विषारी मिथेनॉल पुरवण्याचे मुख्य काम भिवंडीतील मेसर्स रेक्स इंटरनॅशनल (M/s Rex International) या कंपनीने केल्याचे निष्पन्न झाले.
भिवंडीतील गोदामावर एफडीएचा छापा
मिथेनॉलचा पुरवठा भिवंडीतून झाल्याचे स्पष्ट होताच, एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे येथील औषध निरीक्षक योगेंद्र पोळ यांनी तात्काळ पावले उचलली. ‘मेसर्स रेक्स इंटरनॅशनल’ या कंपनीचे अधिकृत कार्यालय वाशी येथे असले, तरी त्यांचे गोदाम भिवंडीतील अंजूर रोड, वळगाव येथील म्हात्रे कंपाऊंडमधील गाळा क्रमांक ५४४/ए (अनंत अँड कंपनी) येथे असल्याची माहिती मिळाली. तेथे तातडीने छापा टाकण्यात आला.
या छाप्यात तब्बल ५,९२९ किलो मिथेनॉल जप्त करण्यात आले. कारवाई दरम्यान कंपनीचे मालक अरुणकुमार चौबे आणि जबाबदार व्यक्ती अभिषेक चौबे हजर नव्हते. धक्कादायक बाब म्हणजे, या गोदामात एवढ्या मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवलेल्या विषारी रसायनाच्या खरेदी-विक्रीची कोणतीही अधिकृत नोंद किंवा आवश्यक कागदपत्रे आढळून आली नाहीत.
गुन्हा दाखल आणि परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू
विषारी द्रव्य नियमांचे सरळ उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनीचे मालक अरुणकुमार चौबे आणि अभिषेक चौबे यांच्याविरोधात भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणे कार्यालयाने कारणे दाखवा नोटीस बजावून संबंधित परवाना रद्द करण्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे.
यापूर्वी देखील अन्न सुरक्षा आणि आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करत प्रशासनाने FDA चा महाराष्ट्रभर मोठा धडाका! तुकाराम मुंढेंच्या आदेशाने ३३ जणांना अटक, २७ आस्थापना सील; भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त करून मोठे पाऊल उचलले होते.
“जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही” – आयुक्त तुकाराम मुंढे
या धडक कारवाईबाबत बोलताना एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कडक इशारा दिला आहे. ते म्हणाले, “सुरक्षित अन्न आणि औषधे मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला पाठीशी घातले जाणार नाही. कायदे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर न्यायालयीन कारवाई केली जाईल.”
सर्वसामान्यांना दर्जेदार अन्न व औषधे मिळावीत यासाठी शासन अनेक स्तरांवर प्रयत्न करत आहे. भाविकांना आणि पर्यटकांना सुरक्षित अन्न मिळावे यासाठी नुकतीच शेगाव आणि शिर्डीत साकारणार अत्याधुनिक ‘फूड स्ट्रीट हब’! भाविकांना मिळणार स्वच्छ आणि पौष्टिक अन्न; केंद्र सरकारकडून २ कोटी मंजूर ही योजना देखील जाहीर करण्यात आली आहे, ज्यामुळे अन्न सुरक्षेचा दर्जा वाढण्यास मदत होईल.
नागरिकांना एफडीएकडून महत्त्वाचे आवाहन
औषधांमधील भेसळ, अवैध साठा किंवा विषारी रसायनांचा गैरवापर होत असल्यास नागरिकांनी पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तक्रार करताना खालील गोष्टींची नोंद घ्यावी:
- तक्रारदाराचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक (गोपनीय ठेवला जाईल).
- संशयास्पद ठिकाणाचा किंवा आस्थापनेचा अचूक पत्ता.
- अवैध कृत्याबद्दल सविस्तर माहिती.
नागरिकांच्या सुविधेसाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे लवकरच एक स्वतंत्र मोबाईल ॲप आणि टोल-फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती सहआयुक्त (औषधे) यांनी दिली आहे.