पुणे बनणार कृषी तंत्रज्ञानाचे जागतिक केंद्र: ‘ॲग्री हॅकॅथॉन’च्या माध्यमातून नाविन्यपूर्ण प्रयोगांना बळ – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

पुणे: विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर आता कृषी तंत्रज्ञानाचे (Agri-Tech) केंद्र म्हणूनही जागतिक नकाशावर झळकत आहे. ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन’च्या माध्यमातून शेती क्षेत्रातील अडीअडचणींवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जात आहे, असे प्रतिपादन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

कृषी विभागाच्या वतीने कृषी महाविद्यालयाच्या सिंचननगर मैदानावर आयोजित ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६’ च्या दिमाखदार उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी विविध कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आणि इस्रायलच्या ग्रीनरोड इनोवेशनचे अध्यक्ष शफरीर गोडेल यांसारखे दिग्गज उपस्थित होते.

महाराष्ट्राचे ‘एआय’ धोरण आणि कृषी समृद्धी

महाराष्ट्र हे कृषी क्षेत्रात देशात नेहमीच आघाडीवर राहिले आहे. कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र ‘कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण’ (AI Policy) जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या धोरणासाठी राज्य शासनाने ५०० कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. विशेष म्हणजे, बारामती येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एआय केंद्र देखील उभारले जात आहे.

राज्यातील कृषी क्षेत्रात आधुनिक गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारने ‘कृषी समृद्धी योजना’ सुरू केली असून, त्यासाठी २ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अशाच प्रकारे महाराष्ट्रात १.१४ लाख कोटींची महागुंतवणूक होत असून एआय डेटा सेंटर्सच्या माध्यमातून रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत.

तरुणांच्या नवसंकल्पनांना मिळणार व्यासपीठ

गतवर्षीच्या हॅकॅथॉनमधील १६ उत्पादनांपैकी १२ उत्पादनांना विद्यापीठांचे प्रमाणीकरण मिळाले असून, ४ उत्पादनांचा समावेश थेट शासकीय कृषी यांत्रिकीकरण योजनेत केला जात आहे. यंदाच्या हॅकॅथॉनमध्ये देशातील १,३०० स्पर्धकांनी सहभाग घेतला असून, त्यात महाराष्ट्रातील ८६७ स्पर्धकांचा समावेश आहे. मृदा आरोग्य, स्मार्ट जल व्यवस्थापन, ड्रोन तंत्रज्ञान आणि पीक संरक्षण यांसारख्या ९ महत्त्वाच्या विषयांवर हे तरुण संशोधन करत आहेत.

सुनेत्रा पवार यांनी यावेळी आरोग्य आणि ग्रामीण विकासावरही भर दिला. नुकताच पुणे जिल्ह्याचा ‘मॉडेल पीएचसी’ पॅटर्न संपूर्ण राज्यात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्याचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते झाले होते.

महिला शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्याचे आवाहन

संयुक्त राष्ट्राने हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. या निमित्ताने राज्यात महिला शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. शेतीमधील कष्ट कमी करण्यासाठी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी महिलांनी या तंत्रज्ञानाचा आणि हॅकॅथॉनमधील नवकल्पनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले.

हॅकॅथॉनमधील प्रमुख विषय:

  • स्मार्ट जल व्यवस्थापन आणि ऑटोमेशन
  • शेती यांत्रिकीकरण (रोबोटिक्स आणि एआय)
  • हवामान-अनुकूल डिजिटल शेती
  • अक्षय ऊर्जा आणि कृषी-कचरा व्यवस्थापन
  • ड्रोन आणि सेन्सर्स आधारित पीक संरक्षण

बदलत्या हवामानात आणि अनिश्चित पावसाच्या परिस्थितीत तंत्रज्ञानाची जोडच शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करू शकते, असा विश्वास या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आला.

Top Posts

पुणे जिल्ह्याच्या विकासाला मिळणार नवा वेग! २०२६-२७ साठी १४७२ कोटींचा विकास आराखडा मंजूर

अधिक वाचा

महाआवास अभियान: महाराष्ट्रात ५ लाख घरांचे लोकार्पण; ३0 लाख घरांचे उद्दिष्ट गाठणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अधिक वाचा

खरीप हंगामासाठी सज्ज व्हा! बोगस बियाणे व खत विक्रेत्यांवर होणार कठोर कारवाई; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देश

अधिक वाचा

मुंबई क्लायमेट वीक अहवालाचे प्रकाशन: हवामान बदलावर आता होणार प्रत्यक्ष कृती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

अधिक वाचा

पुणे बनणार कृषी तंत्रज्ञानाचे जागतिक केंद्र: ‘ॲग्री हॅकॅथॉन’च्या माध्यमातून नाविन्यपूर्ण प्रयोगांना बळ – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

अधिक वाचा