छत्रपती संभाजीनगर: राज्यातील विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर – SIR) प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने दाखल होणाऱ्या सर्व अर्ज, सूचना व हरकतींवर तत्परतेने कार्यवाही करावी. मतदार यादीतील नोंदींची अचूक पडताळणी करताना संपूर्ण प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व नागरिकाभिमुख ठेवण्याचे स्पष्ट निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासह छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली आणि धाराशिव या आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तसेच इतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
प्रारूप मतदार यादी आणि नमुना अर्जांवर त्वरित कार्यवाही
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी नमूद केले की, मतदार नोंदणी, वगळणी व दुरुस्तीच्या कामांना वेग देण्यासाठी मतदार यादीची पाने आणि नोटिसांची छपाई विहित वेळेत पूर्ण झाली पाहिजे. नमुना क्रमांक ६ (नवीन मतदार नोंदणी), नमुना क्रमांक ७ (नाव वगळणी) आणि नमुना क्रमांक ८ (माहितीतील दुरुस्ती) अंतर्गत प्राप्त अर्जांवर नियमांनुसार विनाविलंब निर्णय घेण्यात यावेत.
जर एखाद्या नागरिकाचे नाव प्रारूप मतदार यादीत आढळून आले नाही, तर स्थानिक निवासस्थितीची खात्री करून त्यांच्याकडून तत्काळ नमुना ६ भरून घ्यावा. पात्र नागरिकांचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी निवडणूक यंत्रणेने नागरिकांना योग्य आणि सुलभ मार्गदर्शन उपलब्ध करून दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा: पवित्र पोर्टल शिक्षक भरती: १३,११९ उमेदवारांची शिफारस यादी जाहीर; पाहा सविस्तर तपशील
युवक आणि नवमतदारांसाठी विशेष जनजागृती
१८ वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी महाविद्यालये, तंत्रनिकेतने तसेच मतदार साक्षरता मंचांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती मोहीम राबवावी. समाजमाध्यमे, वर्तमानपत्रे आणि राजकीय पक्षांच्या सहकार्याने मतदार नोंदणी प्रक्रियेची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले. याशिवाय, अनमॅप्ड मतदारांच्या पडताळणीसाठी संपर्क क्रमांक आणि वैध ओळखपत्रांचा प्रभावी वापर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
हे देखील वाचा: पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा: मंदिरे-मठ सुरक्षित ठेवूनच होणार ५० वर्षांचे नियोजन
एसआयआर (SIR) चे सुधारित वेळापत्रक
विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या सुधारित वेळापत्रकानुसार पुढील टप्पे राबविले जाणार आहेत:
- ३१ ऑगस्ट: प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
- ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर: नागरिकांना आपले दावे व हरकती नोंदवता येतील.
- २९ ऑक्टोबरपर्यंत: प्राप्त दावे व हरकतींवर नोटीस बजावणे आणि ते निकाली काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
- ४ नोव्हेंबर: अधिकृत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
नागरिकांनी प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर आपले नाव तपासून घ्यावे आणि आवश्यक असल्यास विहित वेळेत दुरुस्ती अर्ज किंवा दावे दाखल करावेत, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.