मुंबई: देशभरासह महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. याच मंगलमय वातावरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी सपत्नीक भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी गृहमंत्री अमित शाह आणि त्यांच्या पत्नी यांनी भक्तिभावाने बाप्पाची महाआरती संपन्न केली.
‘वर्षा’ निवासस्थानी आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व त्यांच्या पत्नीचे पारंपारिक पद्धतीने पुष्पगुच्छ देऊन आदरपूर्वक स्वागत केले. गणपती बाप्पाच्या दर्शनानंतर उपस्थित मान्यवरांमध्ये स्नेहपूर्ण संवाद पार पडला.
या शुभप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल तसेच आमदार अमित साटम यांच्यासह महायुतीतील अनेक वरिष्ठ नेते आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
गृहमंत्री अमित शाह हे गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी मुंबईतील विविध प्रमुख गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्नीक ‘लालबागच्या राजा’चे दर्शन घेऊन महाराष्ट्रातील जनतेसाठी सुख-समृद्धीची प्रार्थना केली होती. तसेच त्यांनी वांद्रे येथेही गणरायाचे दर्शन घेतले होते, तर ‘नंदगिरी’ निवासस्थानी भेट देऊन बाप्पाचे पूजन केले होते.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने राजकीय नेत्यांमधील गाठीभेटी आणि बाप्पाचे दर्शन यामुळे राज्यातील राजकीय वातावरणामध्येही उत्साहाचे आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले आहे.