नांदेड: आगामी उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा प्रशासनाने ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचे काटेकोर व सूक्ष्म नियोजन करावे, असे स्पष्ट निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. नागरिकांना पाणीटंचाईची झळ बसू नये यासाठी पाणी व्यवस्थापनाबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातून ऑनलाईन माध्यमातून जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त महेश डोईफोडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य साटम आणि पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता इ. मा. चिश्ती आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सध्या संपूर्ण राज्यात पाणी नियोजनाला गती दिली जात असून महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती: पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; जलसाठ्यांचे सूक्ष्म नियोजन करण्याचे प्रशासनाला सक्त निर्देश शासनाकडून सर्व जिल्हा प्रशासनांना देण्यात आले आहेत. याच धर्तीवर नांदेड जिल्ह्यातील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
जिल्ह्यातील धरणांत १० टक्के ‘बफर साठा’ अनिवार्य
नांदेड जिल्ह्यातील १०४ लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी ६८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या उपलब्ध जिवंत साठ्यापैकी किमान १० टक्के साठा हा आपत्कालीन (बफर) साठा म्हणून राखून ठेवण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. पावसाचे खंड पडणे, तीव्र उन्हाळा किंवा इतर आणीबाणीच्या काळात हा राखीव पाणीसाठा नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल.
पालकमंत्री अतुल सावे यांनी दिलेले महत्त्वाचे निर्देश:
- पाण्याचा अपव्यय टाळा: शहरातील सार्वजनिक उद्याने व क्रीडा संकुलांसाठी (स्टेडियम) पिण्याच्या पाण्याचा अनिर्बंध वापर त्वरित थांबवण्यात यावा.
- औद्योगिक पुनर्वापर: एमआयडीसी व औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांनी किमान ३० टक्के पाण्याचा पुनर्वापर (Recycling) करणे बंधनकारक राहील.
- अवैध जोडण्यांवर हातोडा: ग्रामीण व शहरी भागातील अवैध नळ जोडण्या शोधून त्यावर तात्काळ दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी.
- गळती नियंत्रण: महापालिका व नगरपालिका क्षेत्रातील जलवाहिन्यांची गळती तत्काळ दुरुस्त करून पाण्याची नासाडी थांबवावी.
- टँकरचे पूर्वतयारी नियोजन: मार्च आणि एप्रिल महिन्यांत तीव्र पाणीटंचाईची शक्यता असलेल्या गावांची यादी तयार ठेवावी आणि गरजेनुसार विनाविलंब टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे.
प्रशासनाने केवळ कागदोपत्री नियोजन न करता दरमहा पाणीटंचाई परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घ्यावा. तसेच नागरिकांमध्ये जलसाक्षरता निर्माण करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी, अशा सूचनाही यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी दिल्या आहेत.