पुणे: विकास आणि पर्यावरण यांच्यात कोणताही अंतर्विरोध किंवा संघर्ष नसून, या दोन्हींचा योग्य समतोल साधून शाश्वत विकासाकडे वाटचाल करणे ही सद्यस्थितीत काळाची नितांत गरज आहे. निसर्गाचे रक्षण व संवर्धन करणे हे देशातील प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य असून, भावी पिढ्यांना सुरक्षित व समृद्ध पर्यावरणाचा वारसा देणे ही आपली सामूहिक नैतिक जबाबदारी आहे, असे आग्रही प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
भामला फाउंडेशन आणि पंचशील रिअॅलिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘नाला सुशोभीकरण मोहीम’ लोकार्पण तसेच ‘ग्रीन क्रुसेडर्स आणि अचिव्हर्स पुरस्कार’ वितरण सोहळ्यात राज्यपाल बोलत होते.
‘प्रकृती देवो भव’ ही भावना अंगीकारणे आवश्यक
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी भारतीय संस्कृतीतील निसर्गपूजेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “भारतीय जीवनपद्धतीत जंगलांना केवळ झाडे, पाने आणि वन्यजीवांचे अधिवास मानले गेले नसून ते अथांग ज्ञानाचे भांडार मानले गेले आहे. निसर्गाचा विवेकपूर्ण वापर करणे आणि त्याचे शोषण न करणे ही आपल्या पूर्वजांची शिकवण आहे.” ईशान्य भारतातील मेघालय आणि नागालँडमधील पवित्र उपवनांचे (Sacred Groves) उदाहरण देत त्यांनी ‘अतिथी देवो भव’प्रमाणेच प्रत्येकाने ‘प्रकृती देवो भव’ ही भावना प्रत्यक्ष जगण्यात आणण्याचे आवाहन केले.
सध्या जगभरात वाढणाऱ्या ढगफुटी, अचानक येणारे महापूर आणि दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक संकटांवर बोट ठेवत राज्यपालांनी सावध केले. निसर्गाचा अतिरेकी ऱ्हास केल्यास मानवाला मोठी किंमत मोजावी लागते, याचे भान ठेवून पर्यावरण रक्षण ही जनचळवळ झाली पाहिजे. अलीकडेच घडलेल्या नेपाळमधील पूर आपत्ती यांसारख्या घटनांमधून मानवाने वेळीच बोध घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
पर्यावरण संरक्षण ही केवळ मोहीम नव्हे, तर संस्कृती व्हावी: प्रा. राम शिंदे
कार्यक्रमास उपस्थित असलेले महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी नमूद केले की, पर्यावरण रक्षण ही केवळ सरकारी योजना किंवा मोहीम न राहता प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली पाहिजे. हवामान बदलाचे संकट आता केवळ भविष्यातील चर्चा नसून वर्तमानातील भीषण वास्तव बनले आहे. वीज आणि पाण्याची बचत, प्लास्टिकचा त्याग आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड यांसारख्या छोट्या कृतींमधूनही समाजात मोठे सकारात्मक परिवर्तन घडू शकते. वन्यजीव आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करण्यासाठी राज्यभरात नागपूरच्या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानासारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवून लोकसहभाग वाढवणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पर्यावरण रक्षणाचा संदेश
या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष व्हिडिओ संदेश चित्रफीत दाखवण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी भामला फाउंडेशनच्या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे कौतुक केले. प्लास्टिक कचऱ्यामुळे निसर्गावर आणि मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम अत्यंत गंभीर असून, प्रत्येकाने ‘सिंगल युज प्लास्टिक’चा वापर तातडीने थांबवून पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
निसर्गाकडे संवेदनशील दृष्टीने पाहण्याची वेळ: पंकजा मुंडे
पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी वाढत्या काँक्रिटीकरणावर चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “शहरांच्या वेगाने होणाऱ्या विस्तारामुळे मानवाचे निसर्गाशी असलेले मूळ नाते तुटत चालले आहे. त्यामुळे विकासाची गती सांभाळताना निसर्गाप्रती अत्यंत संवेदनशील राहणे आवश्यक आहे. प्रत्येकाने थोडा वेळ काढून निसर्गाचा विचार करावा आणि वृक्षारोपण, पाण्याची बचत यांसारख्या सवयी अंगीकाराव्यात.”
उल्लेखनीय कार्यासाठी ‘ग्रीन क्रुसेडर्स’ पुरस्कारांचे वितरण
या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांना ‘ग्रीन क्रुसेडर्स आणि अचिव्हर्स’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, गोदरेज इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक नादिर गोदरेज आणि इतर अनेक मान्यवरांचा समावेश होता. पुण्यात तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात आलेले नाला सुशोभीकरण आणि विक्रेत्यांच्या उपजीविकेचे करण्यात आलेले नियोजन हे शाश्वत विकासाचे आदर्श उदाहरण असल्याचे मान्यवरांनी यावेळी स्पष्ट केले.