मुंबई: असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाच्या (API) महाराष्ट्र राज्य शाखेच्या एका विशेष शिष्टमंडळाने नुकतीच महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन (राजभवन) येथे सदिच्छा भेट घेतली. संस्थेचे मानद सचिव डॉ. आगम वोरा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या भेटीदरम्यान, देशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला दिशा देणाऱ्या दोन राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्त्वाच्या वैद्यकीय प्रकाशनांची प्रत राज्यपालांना सप्रेम भेट देण्यात आली.
या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान आरोग्य क्षेत्रातील विविध आव्हानांवर चर्चा करण्यात आली. राज्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असतानाच, ग्रामीण ते जिल्हा रुग्णालयांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवांची मानके निश्चित करण्यासारखे अनेक सकारात्मक निर्णय घेतले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर वैद्यकीय तज्ज्ञांच्या या प्रकाशनांचे विशेष महत्त्व मानले जात आहे.
१. ‘युनिफाइड कन्सेंन्सस ऑन अॅडल्ट इम्युनायझेशन २०२६’ (प्रौढ लसीकरण मार्गदर्शिका)
शिष्टमंडळाने सादर केलेले पहिले पुस्तक ‘Unified Consensus on Adult Immunization 2026’ हे आहे. हे प्रकाशन इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) इतर प्रमुख वैद्यकीय संस्थांच्या संयुक्त सहकार्याने तयार केले आहे. या पुस्तकात प्रौढांच्या लसीकरणाबाबत देशभरातील नामवंत तज्ज्ञांच्या शिफारसी व मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट आहेत.
या संदर्भात माहिती देताना डॉ. आगम वोरा म्हणाले, “आपल्या देशात दरवर्षी विविध प्रकारच्या विषाणूजन्य संसर्गांमुळे (Viral Infections) सुमारे ५ लाखांहून अधिक निष्पाप नागरिकांचा मृत्यू होतो. जर प्रौढांमध्ये वेळेवर लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवली, तर हे टाळता येण्याजोगे मृत्यू रोखण्यात मोठे यश मिळू शकते.”
२. ‘सीओपीडी कंपास २०२६’ (श्वसनविकार व्यवस्थापन)
दुसरे पुस्तक ‘COPD Compass 2026’ या शीर्षकाचे असून ते क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज (COPD – फुफ्फुसांचे जुनाट व दीर्घकालीन आजार) यावरील सर्वसमावेशक मार्गदर्शिका आहे. भारतातील वाढते प्रदूषण आणि बदलत्या जीवनशैलीमुळे श्वसनविकारांचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, तज्ज्ञ डॉक्टरांच्या पॅनेलने तयार केलेल्या या पुस्तकात अशा आजारांचे अचूक निदान आणि आधुनिक उपचार पद्धतींवर सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
राज्यातील गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा सुलभ करण्यासाठी धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत; अशा वेळी या शास्त्रीय मार्गदर्शिका डॉक्टरांना अचूक उपचारासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील.
या शिष्टमंडळात डॉ. आगम वोरा यांच्यासह डॉ. राकेश बडदे, डॉ. मिलिंद नाडकर्णी, डॉ. अमित सराफ, डॉ. जयस लेले, आशुतोष पांडे तसेच झायडस हेल्थकेअरच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती दलाल यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राज्यपालांनी वैद्यकीय तज्ज्ञांच्या या संशोधनात्मक कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले.