सिंधुदुर्ग: गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सामाजिक भान आणि नैतिक संस्कार रुजवणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी केवळ शिक्षकच नव्हे, तर पालक, माजी विद्यार्थी आणि संपूर्ण समाजाने एकत्रितपणे काम केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्य संपादन करून स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि देशाचे सुजाण व जबाबदार नागरिक बनावे, असे स्पष्ट मत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले.
‘चला शाळेत जाऊया’ या विशेष अभियानांतर्गत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ६ शाळांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. या दौऱ्यादरम्यान त्यांनी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापन समित्यांशी संवाद साधून शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, जि. प. उपाध्यक्ष दादा साईल तसेच शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कमी पटसंख्या असली तरी शाळा बंद होणार नाहीत!
कुडाळ हायस्कूलला भेट दिली असता मंत्री भुसे यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केले. ग्रामीण अथवा दुर्गम भागातील शाळांची पटसंख्या कमी असली तरी शासन शाळा बंद करणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. अशा शाळांचा दर्जा व शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि गावकऱ्यांनी समन्वय ठेवून लोकसहभागातून प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय, ग्रामीण शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाने शाळांच्या दुरुस्तीसाठी थेट बँक खात्यात निधी देण्याचा आणि सायन्स सेंटर उभारण्याचा निर्णय घेतल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
विद्यार्थिनींसाठी ‘सेल्फ डिफेन्स’ आणि विद्यार्थ्यांमध्ये शिस्त
कुडाळ हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी राबविल्या जाणाऱ्या ‘राणी लक्ष्मीबाई सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण’ उपक्रमाची मंत्र्यांनी प्रशंसा केली. प्रत्येक शाळेने विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यावर भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले.
त्यानंतर बॅ. नाथ पै शैक्षणिक भवनात भेट दिली असता एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलनाद्वारे मंत्र्यांना मानवंदना दिली. एनसीसीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारी आणि राष्ट्रनिष्ठेची भावना बळावते. ही शिस्त केवळ ठरावीक तुकडीपुरती न राहता सर्वच विद्यार्थ्यांच्या अंगी बाणवण्यासाठी प्राथमिक स्तरापासूनच परेड व ड्रिलचे प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे मंत्री भुसे यांनी नमूद केले.
पालकांनी मोबाईलचा वापर कमी करून पाल्यांशी संवाद वाढवावा
एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाट येथे आयोजित पालक मेळाव्यात बोलताना मंत्री दादाजी भुसे यांनी पालकांना मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, “शाळेत शिक्षक ज्ञान देण्याचे काम करतात, मात्र घरामध्ये मुलांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका सर्वाधिक असते. पालकांनी स्वतः मोबाईलचा वापर मर्यादित ठेवून मुलांशी नियमित सुसंवाद साधला पाहिजे. पाल्यांच्या आवडीनिवडी ओळखून त्यांना प्रोत्साहन द्या.” माजी विद्यार्थ्यांनीही आपल्या मातृसंस्थेचे ऋण फेडण्यासाठी शाळांच्या विकासात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. विशेष म्हणजे, सिंधुदुर्ग दौऱ्यात त्यांनी पाट येथे मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते वनराई बंधाऱ्यासाठी श्रमदान करत जलसंधारणाचा संदेशही दिला होता.
‘आभाळ कोकलंय’ पथनाट्यातून दुष्काळ व जलसंवर्धनाचा संदेश
पणदूर येथील शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी ‘आभाळ कोकलंय’ हे दुष्काळ आणि पर्यावरण समस्येवर आधारित प्रभावी पथनाट्य सादर केले. या सादरीकरणाचे मंत्री महोदयांनी विशेष कौतुक केले. पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी ‘एक पेड माँ के नाम’ अभियानात सहभागी व्हावे, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना एक महत्त्वपूर्ण संस्कार दिला:
- घरात रोज सकाळी आणि संध्याकाळी ज्येष्ठांचा आदर करावा.
- अन्नाचा प्रत्येक घास खाण्यापूर्वी कष्टकरी शेतकऱ्याचे स्मरण करावे.
- रात्री झोपताना देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी.
दौऱ्याच्या शेवटी कुडाळ येथील पडतेवाडी प्राथमिक शाळा आणि पावशी येथील पूर्ण प्राथमिक शाळा क्र. १ येथे भेट देऊन मंत्री महोदयांनी विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य तपासले आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे मनोबल वाढवले.