ठाणे: कळवा पूर्व येथील भास्कर नगर, आदर्श चाळ परिसरात डोंगरावरून येणाऱ्या प्रचंड पाण्याच्या प्रवाहामुळे निर्माण झालेला मोठा धोका जिल्हा प्रशासनाच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे टळला आहे. डोंगरावरून मोठ्या प्रमाणात वाहून येणाऱ्या पाण्यामुळे परिसरातील घरे वाहून जाण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली होती. या गंभीर समस्येची जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेत योग्य पावले उचलली आहेत.
सध्या ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळत असून यामुळे अनेक ठिकाणी डोंगराळ आणि सखल भागांत आपत्कालीन परिस्थिती निर्माण होत आहे. कळव्यातील या संवेदनशील घटनेची माहिती मिळताच, ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांनी यंत्रणेला तात्काळ अलर्ट केले.
प्रशासनाकडून तातडीने प्रत्यक्ष पाहणी व कार्यवाही
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तहसीलदार उमेश पाटील यांनी संबंधित सर्व यंत्रणांशी समन्वय साधला. त्यानंतर कळवा येथील ग्राम महसूल अधिकारी, ठाणे महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी आणि स्थानिक नगरसेविका चंद्रकांता साळी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.
पाहणी दरम्यान असे आढळून आले की, डोंगरावरून खाली येणाऱ्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहातील मुख्य नाले कचरा आणि गाळ साचल्यामुळे तुंबले (चोकअप) होते. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊन पाणी आजूबाजूच्या घरांमध्ये शिरण्यास सुरुवात झाली होती. ही परिस्थिती अत्यंत धोकादायक बनू शकत होती.
नाल्यांची स्वच्छता आणि पाण्याचा योग्य निचरा
संभाव्य धोका ओळखून ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ नाल्यांची साफसफाई करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. चोकअप झालेले नाले तात्काळ मोकळे केल्यामुळे डोंगरावरून येणारा पाण्याचा प्रवाह पूर्ववत झाला. आता हे पाणी ड्रेनेज मार्ग व्यवस्थित वाहून जात आहे.
प्रशासनाच्या या जलद कामगिरीमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून सध्या कोणत्याही घरात पाणी साचलेले नाही. तसेच या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे थैमान आणि पुराचा धोका असताना ठाणे जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, ठाणे महानगरपालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दाखवलेल्या या समन्वयामुळे एक मोठी दुर्घटना वेळेत रोखण्यात यश आले आहे.